‘पोकरा’त अकोट उपविभागाची भरारी; विदर्भात अव्वल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:43+5:302021-05-23T04:17:43+5:30
राज्यातील १५ जिल्ह्यातील ५,१४२ गावांमध्ये पोकरा प्रकल्प राबविण्यात येत आहे. २०२३-२४ पर्यंत सहा वर्षांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ...
राज्यातील १५ जिल्ह्यातील ५,१४२ गावांमध्ये पोकरा प्रकल्प राबविण्यात येत आहे. २०२३-२४ पर्यंत सहा वर्षांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भाचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पाचे सर्वांगीण उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने प्रकल्पातील सर्व योजना, घटक राबविण्यात येणार असल्याचे ठरले आहे. पोकरा प्रकल्पाच्या डीबीटी पोर्टलवर योजनेंतर्गत येणाऱ्या ५ हजार १४२ गावातील ७ लाख ५४ हजार ९७ शेतकऱ्यांनी विविध घटकासाठी नोंदणी केली आहे. विदर्भातील खारपाणपट्टा क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यावर्षीची कामगिरी पाहता या योजनेला काही प्रमाणात गती मिळाल्याचे दिसून येते. या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत, तर लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे. अकोट उपविभागात विदर्भात सर्वाधिक चांगली कामगिरी झाली असल्याचे कृषी विभागाने सांगितले. शेतकरी गट व कंपन्या, शेतीशाळा, वैयक्तिक लाभाचे घटक यात जास्तीत जास्त लाभ देण्यात येत आहे.
--बॉक्स--
राज्यात आठवा क्रमांक
शेतकऱ्यासाठी असलेल्या नाविन्यपूर्ण पोकरा योजनेमध्ये एकंदरीत कामगिरीमध्ये अकोट उपविभागाचा राज्यात आठवा क्रमांक लागतो. तर वाशीम ११ व अकोला उपविभागाचा १२ वा क्रमांक लागतो.
--बॉक्स--
विदर्भातील या जिल्ह्यात राबविली जातेय योजना
राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेमध्ये विदर्भातील ६ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात योजना राबविली जात आहे.
--बॉक्स--
मृद, जलसंधारणात हिंगणघाट तर शेतीशाळामध्ये पांढरकवडाची भरारी
पोकरा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मृद, जलसंधारणाचा कामांमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागाने व शेतीशाळांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा उपविभागाने भरारी घेतली आहे. हे दोन्ही उपविभाग राज्यात अव्वल आहेत.