प्रधानमंत्री घरकुल योजनेत अकोट तालुका प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 02:54 AM2017-05-08T02:54:26+5:302017-05-08T02:54:26+5:30
अमरावती विभागात १५ पं.स.ची उद्दिष्टपूर्ती
विजय शिंदे
अकोट: शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये अमरावती विभागातून १५ पंचायत समित्यांनी १00 टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक उद्दिष्ट घेतलेली अकोट पंचायत समिती अमरावती विभागातून प्रथम ठरली आहे.
केंद्र शासनाने पूर्वीची इंदिरा आवास योजना बंद करून २0१६-१७ पासून प्रधानमंत्री घरकुल योजना अमलात आणली. सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना सर्र्वेक्षण २0११ नुसार ग्रामीण भागातील घरकुलासाठी पात्र लाभार्थींची प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी निवड करण्यात आली. अमरावती विभागात ५६ पंचायत समित्यांमध्ये ही योजना राबविण्यात आली. यामध्ये अकोट पंचायत समितीला सर्वाधिक १७१५ एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. घरकुल मंजुरातीचे उद्दिष्ट पंचायत समितीने १00 टक्के पूर्ण केल्याने अमरावती विभागात अकोट पं.स. प्रथम ठरली आहे. १00 टक्के उद्दिष्टपूर्ती करणार्या उर्वरित १४ पंचायत समित्यांमध्ये तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, घाटंजी, उमरखेड, पातूर, केलापूर, महागाव, बाश्रीटाकळी, कळंब, नेर, दिग्रस, राळेगाव, वणी यांचा समावेश आहे. प्रमुख जिल्हा स्तरावरील अकोला, यवतमाळ, वाशिम या पंचायत समित्यांनी ९९ टक्क्यांच्यावर उद्दिष्टपूर्ती केली आहे. बुलडाणा पं.स. ८४.८५, अमरावती पं.स. ७१ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे.
अकोट पंचायत समिती अंतर्गत गटविकास अधिकारी कालिदास तापी यांनी जनजागृती करीत नियोजनबद्ध पद्धतीने योजना राबविली. यामध्ये १७१५ लाभार्थींमध्ये अनुसूचित जाती २३७, अनुसूचित जमाती ७८९, अल्पसंख्याक ३९६ व इतर २९३ लाभार्थींना घरकुले मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थींना बांधकामाच्या प्रगतीवर तीन टप्प्यात प्रत्येकी १ लाख २0 हजारांचे अनुदान देण्यात येत आहे. त्याव्यतिरिक्त मजुरीचा खर्च म्हणून नरेगा योजनेतून २0 हजार रुपये उपलब्ध करून देण्यात येतात. लाभार्थींचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने खात्यात जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत ९८ टक्के लाभार्थींना ३0 हजार रुपयांचा पहिला टप्पा वितरित करण्यात आला आहे. अकोट तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अजूनही घरकुलाची कामे सुरू असून, या योजनेंतर्गत कामासाठी लाभार्थी खाते उघडण्याकरिता राष्ट्रीयीकृत बँकांनी संपूर्ण सहकार्य केल्याने व पं.स.च्या सर्व घटकांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्याने अमरावती विभागात प्रथम ठरल्याची प्रतिक्रिया गटविकास अधिकारी कालिदास तापी यांनी व्यक्त केली.