अकोट-तेल्हार्याची केळी पोहचली इराकमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:55 AM2018-01-01T00:55:02+5:302018-01-01T01:05:34+5:30
अकोट : शेतकरी व बाजारपेठमधील दलालाची साखळी नष्ट होऊन अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडल्या गेला आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यातील केळी ही इराकमध्ये पोहचली आहे.
विजय शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : शेतकरी व बाजारपेठमधील दलालाची साखळी नष्ट होऊन अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडल्या गेला आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यातील केळी ही इराकमध्ये पोहचली आहे. अकोटच्या केळीची उत्कृष्ट गुणवत्ता असल्याने वाढती मागणी पाहता मुंबई येथील तीन निर्यातकर्त्यांनी शासनाच्या माध्यमातून अकोट उप विभागातील केळी पेर्याकरिता ५00 एकर शेतीचा करार शेतकर्यांसोबत केला आहे. त्यामुळे नववर्षात या भागातील केळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करणार आहे.
काळी कसदार जमीन, पाण्याची उपलब्धता व केळीच्या पिकाला पोषक हवामान असताना केळीच्या उत्पादनाला मात्र पाहिजे तसा भाव या परिसरात मिळत नव्हता. शिवाय शेतकर्यांची फसवणूक व लुटीचे प्रकार वाढीस लागले असतानाच केळीला योग्य व जास्तीत जास्त मूल्य मिळावे, याकरिता भारत सरकारच्या महाराष्ट्र राज्य कृषी व पणन विकास मंडळाने केळी निर्यात करणारे व्यापारी, शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी उपलब्ध करून दिली. पूर्वी या भागातली केळी अंजनगाव, रावेल या बाजारपेठेत जात होती. याठिकाणी केळीचे ग्रेड पाडून केळी उत्पादकांना वेठीस धरण्यात येत होते. केळी उत्पादकांची होत असलेली पिळवणूक पाहता उप जिल्हाधिकारी अशोक अमानकर व पणजचे पोलीस पाटील पंजाबराव बोचे यांनी तत्कालीन अकोला जिल्हाधिकारी तथा सध्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असलेले डॉ.श्रीकर परदेशी यांच्या माध्यमातून भारत सरकारची कृषी व साधन प्रक्रियायुक्त मालाची आयात-निर्यात धोरण ठरविणारी संस्था (अपेडा) च्या माध्यमातून दिल्ली व मुंबई येथील कार्यालयांशी संपर्क साधून अकोटच्या केळीची गुणवत्ता पटवून दिली. त्यानंतर थेट तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोट येथे केळी उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांची बैठक घेऊन शासनाचा निर्यात व आयात धोरणाची माहिती विशद केली. त्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शेतकर्यांना योग्य व जास्तीत जास्त मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळावे म्हणून पुढाकार घेत हिरवी झेंडी दाखवून केळीचा पहिला कंटेनर इराकला रवाना केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अकोटच्या केळीची मागणी पाहता मुंबईच्या तीन निर्यातकर्त्यांनी अकोट उपविभागात ५00 एकर शेतीचा करार केळी उत्पादक शेतकर्यांसोबत जिल्हाधिकार्यांच्या मध्यस्थीने केला.
तर पोलीस पाटील पंजाबराव बोचे यांच्यासह ११ जणांनी मिळून नरनाळा प्रोड्यूसर कंपनी स्थापन करुन, १00 शेतकर्यांचे शेअर्स या कंपनीमध्ये घेतले. ज्या शेतकर्यांचा माल निर्यातीसाठी घेण्यात येईल, त्यांना रावेलच्या बाजारभावापेक्षा १00 रुपये प्रतिकिं्वटल जास्त दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच या करारात शेतातील माल काढल्यानंतर शेतकर्यांना त्वरित रक्कम देण्याबाबत करार करण्यात आला आहे. कंपनीचे प्रतिनिधी, तालुका प्रशासनाचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत शेतकर्यांची यादी तयार करून, आय एन आय कंपनीकडे देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या उपक्रमाची जबाबदारी मंडळ अधिकारी राजेश बोडखे यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे पंजाबराव बोचे यांनी सांगितले.
अकोट उप विभागातील केळी इराकला पोहचली आहे. केळीला चांगले मूल्य मिळत असल्याने निर्यातदार कंपन्यांनी शेतीकरार केला आहे. त्यांना इतर बाजारपेठेच्या तुलनेत १00 रुपयांनी अधिक भाव दिल्या जाणार आहे. या निर्यात धोरणाकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल विभाग अकोट यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकर्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळाले आहे.
- पंजाबराव बोचे, केळी उत्पादक, पणज