अकोट : आज महावैष्णव गुरुमाउलींचा जन्मोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 02:28 AM2018-02-18T02:28:12+5:302018-02-18T02:28:19+5:30
अकोट : महावैष्णव गुरुमाउली श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवाची पूर्णाहुती सद्गुरूंच्या जन्मोत्सव सोहळ्याने १८ फेब्रुवारी रोजी होत असून, श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे विविध कार्यक्रम होत आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : महावैष्णव गुरुमाउली श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवाची पूर्णाहुती सद्गुरूंच्या जन्मोत्सव सोहळ्याने १८ फेब्रुवारी रोजी होत असून, श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे विविध कार्यक्रम होत आहेत.
श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारा गुरुमाउली ‘श्रीं’चा जयंती महोत्सव ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान श्रद्धासागर येथे संपन्न होत आहे. या भक्ती सोहळ्याची पूर्णाहुती जन्मोत्सव सोहळ्याने १८ फेब्रुवारी रोजी होत असून, पहाटे ५ वाजता ‘श्रीं’चा महाभिषेक पार पडेल. तद्नंतर वासुदेव नगरस्थित गुरुमाउलींच्या निवासस्थावरून गुरुमाउली पादुका रथयात्रा व वारकरी दिंडी सोहळा आयोजित असून, या दिंडीत गावोगावची वारकरी भजनी मंडळे सहभागी होत आहेत. शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत श्रद्धासागर येथे पोहोचणार आहेत. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांच्या मंडळाला संत वासुदेव महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे.
आज काल्याचे कीर्तन
महोत्सवादरम्यान सकाळी १0 वाजता विठ्ठल महाराज कोरडे आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता ‘श्रीं’चा जन्मोत्सव सोहळा तद्नंतर महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. या भक्ती सोहळ्याला भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले व सर्व विश्वस्तांनी केले आहे.