अकोटातील काँग्रेस नगरसेवकाच्या जुगार अड्ड्यावर छापा
By admin | Published: April 20, 2017 01:54 AM2017-04-20T01:54:29+5:302017-04-20T01:54:29+5:30
चार जणांना अटक, १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अकोला : अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकळी फाट्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पोलीस पथकाने छापा घालून जुगार खेळणाऱ्या चार जणांना अटक केली. ही कारवाई बुधवारी रात्रीदरम्यान करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. अकोटातील एका काँग्रेस नगरसेवकाचा हा जुगार अड्डा असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पोलीस पथकाला अकोट तालुक्यातील सुकळी फाट्यावर वरली जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. विशेष पोलीस पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पथकास जुगार अड्ड्यावर छापा घातला.
यावेळी दहा ते बारा जण जुगार खेळत होते; परंतु पोलिसांना पाहून अनेकांनी मिळेल त्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला.
त्यापैकी पोलिसांनी सलीम शाह इब्राहिम शाह (३३ रा. काठीपुरा अंजनगाव सुर्जी), सैयद काजिम सैयद नाजिम (२८ रा. इत्तेगार प्लॉट अकोट), अक्रम शाह अन्वर शाह (२४ रा. अलिमपुरा अकोट) आणि मजर अली सैयद मुकद्दर (४० रा. खतिफपुरा अकोट) यांना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी मोबाइल, त्यांच्या मोटारसायकल आणि रोख असा एकूण १ लाख ७७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सुकळी फाट्यावरील जुगार अड्डा हा अकोटातील एका काँग्रेस नगरसेवकाचा असल्याचे समजते. अकोट ग्रामीण पोलिसांनीसुद्धा या माहितीला दूजोरा दिला आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृतरित्या माहिती दिली नाही. विशेष पोलीस पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाइल बंद होता.
जुगार खेळणाऱ्यास अटक
अकोला : जुने शहरातील महाकाली नगरात सट्टापट्टीचा जुगार खेळताना पोलिसांनी संजय विठ्ठलराव घुगे (रा. शिवसेना वसाहत) याला अटक केली. त्याच्याकडून चिठ्ठ्या व १२५० रुपये रोख जप्त केले.