अकोटच्या दिव्यांग धीरजने रशियामधील माउंट एलब्रुसवर फडकविला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 01:35 PM2019-08-18T13:35:06+5:302019-08-18T13:38:23+5:30

भारतातून हे शिखर सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला दिव्यांग असल्याचे मानल्या जात आहे.

Akot's disable youth treck on Mount Elbrus in Russia | अकोटच्या दिव्यांग धीरजने रशियामधील माउंट एलब्रुसवर फडकविला तिरंगा

अकोटच्या दिव्यांग धीरजने रशियामधील माउंट एलब्रुसवर फडकविला तिरंगा

Next
ठळक मुद्देशिखराची उंची ५ हजार ६४२ मीटर एवढी असून अत्यंत प्रतिकुल वातावरणात चढाई करावी लागते. कडाक्याची थंडी व खडतर वातावरणाशी दोन हात करीत धीरजने धाडसी वृत्तीचा परिचय दिला आहे. १५ आॅगस्ट रोजी रात्री चढाईला सुरुवात करुन १६ आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता शिखर गाठले.


अकोट: येथील दिव्यांग गिर्यारोहक धीरज बंडू कळसाईत या २२ वर्षीय युवकाने रशियामधील सर्वोच्च हिम शिखर माउंट एलब्रुस सर करीत स्वातंत्र्यदिन तिरंग्याला अनोखी मानवंदना दिली. त्याच्या या विक्रमामुळे अकोला जिल्हाच्या नव्हे तर महाराष्ट्रच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. एक हात, एक पाय नसतानासुद्धा जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व धाडसाच्या बळावर हे शिखर गाठले. भारतातून हे शिखर सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला दिव्यांग असल्याचे मानल्या जात आहे.
धीरजने दक्षिण आफ्रिकेतील माउंट किलीमंजारो हे हिमशिखर यापूर्वीच सर केले होते. हे शिखर सर करणारा तो पहिला भारतीय दिव्यांग गिर्यारोहक ठरला. त्याच्या या विक्रमाची इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड व महाराष्ट्र बुक आॅफ रेकॉर्डला नोंदसुद्धा करण्यात आली. रशियातील माउंट एलब्रुस या शिखराची उंची ५ हजार ६४२ मीटर एवढी असून अत्यंत प्रतिकुल वातावरणात चढाई करावी लागते. हे शिखर संपूर्णत: बर्फाच्छादित आहे. त्या ठिकाणचे तापमान उणे असून कडाक्याची थंडी व खडतर वातावरणाशी दोन हात करीत धीरजने धाडसी वृत्तीचा पुन्हा एकदा परिचय दिला आहे. शारीरिीकदृष्ट्या सुदृढ असलेल्या गिर्यारोहकालासुद्धा सदर शिखर सर करणे अनेक वेळा अशक्यप्राय ठरते. अशा या शिखरावर धीरजने तिरंगा फडकावला आहे. धीरज याने १५ आॅगस्ट रोजी रात्री चढाईला सुरुवात करुन १६ आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता शिखर गाठले. शिखरावर पोहोचताच स्वातंत्र्य दिनाचे औचित साधून त्याने भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला आणि मानवंदना देत राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
सुसाट्याचा वारा, खडतर चढाई, मृत्यू डोळ्यासमोर आणि आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन डाव्या हातांची बोटे आणि एका पायाने अपंग असतानाही गिर्यारोहणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात धीरजने नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
एकापाठोपाठ एक असे विक्रम तो आपल्या नावे नोंदवित आहे. याआधी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळत धीरज कळसाईतने कळसुबाई शिखर, लिंगाणा, पावन खिंड, तुंगागड, त्रिकोणा गड, सुधागड अशा शिखरांवर यशस्वी गिर्यारोहण केले आहे.


संघर्षमय साहसी प्रवास
धीरज कळसाईतच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. भूमिहीन असून, वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. धीरजने आर्थिक संकटाला तोंड देत मुक्त विद्यापीठातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आधीच जन्मापासून डावा हात मनगटापासून नसल्याने त्याचा जीवन जगण्याचा संघर्ष असतानाच सन २०१४ मध्ये झालेल्या अपघातात त्याला आपला एक पाय गमवावा लागला होता. शरिरात दिव्यांग आले असले तरी मात्र त्याने आपला आत्मविश्वास कमी होऊ न देता उंच शिखरासारखी उंच स्वप्न बघत हे यश गाठले. आपल्या दृढ निश्चयाने त्याने आउंट एलब्रुस शिखर सर केल्यानंतर जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेट सर करण्याची जिद्द मनाशी बाळगून आहे.

Web Title: Akot's disable youth treck on Mount Elbrus in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.