अकोटच्या दिव्यांग धिरजची टांझानियातील किलीमांजरो शिखर सर करण्याची जिद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 03:58 PM2018-12-02T15:58:44+5:302018-12-02T16:02:41+5:30
लिंगाणा शिखर गाठल्यानंतर धिरज आता दक्षिण आफ्रीकेतील टांन्झानिय मधील माउंट किलीमांझजरो हे हिमशिखर गाठण्याकरिता जानेवारी महिन्यात जाणार आहे.
- विजय शिंदे
आकोट: जगात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. धडधाकट असलेल्यांनाही आत्मविश्वास, जिद्द, साहस, चिकाटीचे धडे देणार्या आकोट येथील धिरज बंडू कळसाईत याने आपण शरिराने दिव्यांग असलो तरी मनाने दृढ निश्चयी असल्याचे त्याच्या साहसीवृत्तीवरुन सिध्द केले आहे. एका हाताला बोटं नसल्याने दगडावर पकड करण्यास अडचणीचे ठरत असताना त्याने लिंगाणा शिखर गाठल्यानंतर धिरज आता दक्षिण आफ्रीकेतील टांन्झानिय मधील माउंट किलीमांझजरो हे हिमशिखर गाठण्याकरिता जानेवारी महिन्यात जाणार आहे. तर जगातील सर्वात उंचीचे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न ध्येयवेड्या धिरज चे आहे.
धिरज कळसाईतच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असुन आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. भूमिहीन असून वडील मजूरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आर्थिक स्रोत नसल्याने 2015 मध्ये बहिणीचे शिक्षण थांबले. धिरजने आर्थिक संकटाला तोंड देत मुक्त विद्यापीठातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आधीच जन्मापासून डावा हात मनगटापासून नसल्याने त्याचा जीवन जगण्याचा संघर्ष असतांनाच सन 2014 मध्ये झालेल्या अपघातात त्याला आपला एक पाय गमवावा लागला होता. शरिरात दिव्यांग आले असले तरी मात्र त्याने आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. प्रगल्भ इच्छाशक्तीच्या जोरावर जगावेगळं कर्तृत्व करायची जिद्द पुर्ण करित त्याने जगात अशक्य अशी कुठलीही गोष्ट नसल्याचे अनेकदा सिध्द केले आहे. धिरज कळसाईत मुळचा सोलापूर जिल्ह्यातला परंतु 17 - 18 वर्षापासून त्याचे वास्तव्य आकोट येथील आपल्या मामाकडे आहे. धिरजला लहानपणापासूनच गिर्यारोहणाची ओढ आहे. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, धाडस या गुणाच्या बळावर त्याने आपल्या दिव्यांगत्वावर मात केली आहे. लिंगाणा हा सह्याद्री पर्वतरांगेतील राजगड व तोरणा यांच्यामध्ये असलेलेले खडतर असे 950 मिटर उंचीचे शिखर आहे. परंतु धिरज ने कळसुबाई शिखर हे 2016 मध्ये अवघ्या तीन तासात सर केले. धिरजने याआधी कळसुबाई शिखर, लिंगाणा, पावन खिंड, तुंगागड, त्रिकोणा गड, सुधागड अशा शिखरावर गिर्यारोहण केले आहे. आता नविन वर्षात 10 जानेवारी रोजी धिरज कळसाईत हा दक्षिण आफ्रीकेतील टांन्झानिय मधील माउंट किलीमांझरो या 19 हजार 341 फुट व 5 हजार 895 मिटर असलेल्या हिमशिखर सर करण्याकरिता जाणार आहे.
भविष्यात जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट चढण्याची माझी इच्छा असून त्याचा सरावाकरिता व दिव्यांगांना एक बहुमान मिळविण्याच्या दृष्टीने जानेवारी महिन्यात माऊंट किलोमांजरो या मोहीमेवर जात आहे. या मोहीमेकरिता आर्थिक अडचणी येत असल्या तरी अनेकांचे मदतीचे हात मनोबळ वाढवित आहेत.
- धिरज कळसाईत, दिव्यांग गिर्यारोहक, आकोट