अकोटच्या माजी नगराध्यक्षांच्या पतीस अटक
By admin | Published: July 16, 2017 02:31 AM2017-07-16T02:31:42+5:302017-07-16T02:31:42+5:30
अमरावती जिल्ह्यातील कारवाई : तितराची शिकार करणे भोवले!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तितर पक्ष्याची शिकार करून त्याच्या मासाची तस्करी केल्याच्या आरोपावरून अकोटच्या माजी नगराध्यक्षांच्या पतीस गुरुवारी मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई भातकुली फाट्यावर अमरावती येथील फिरत्या पथकाने केली.तितर पक्ष्याचे तीन मांसाचे तुकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.
दर्यापूर येथे तितर पक्ष्याची शिकार करून त्याचे मांस चारचाकी क्रमांक एमएच ३0 एफ ४९६४ वाहनातून जात असल्याची गोपनीय माहिती परतवाड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. बारखडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे अमरावती येथील फिरत्या पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर व दर्यापूर वतरुळ अधिकारी जी.व्ही. आमले यांनी या वाहनाचा पाठलाग करून त्यास अमरावती ते दर्यापूर मार्गावर भातकुली फाट्याजवळ अडविले. वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात तीन मांसाचे तुकडे आढळून आले. या वाहनाचे चालक तथा अकोटच्या माजी नगराध्यक्षांचे पती हिम्मत चरण चंडालिया (वाल्मिकीनगर, अकोट) याला ताब्यात घेतले. तितर पक्ष्याचे मांस व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम २ (१६), ९, ३९, ४३,४४, ५0, ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.