अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-यास चार वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 07:43 PM2017-07-28T19:43:47+5:302017-07-28T19:43:51+5:30
अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात घुसून विनयभंग करणा-या 28 वर्षीय पुरुषोत्तम सूर्यभान तायडे या आरोपीस शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने पॉस्को कायद्यान्वये चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
अकोला, दि. 28 - मूर्तिजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिरपूर येथील रहिवासी एका अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात घुसून विनयभंग करणा-या 28 वर्षीय पुरुषोत्तम सूर्यभान तायडे या आरोपीस शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने पॉस्को कायद्यान्वये चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच दोन हजार रुपये दंड ठोठावला. हिरपूर येथील एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आई-वडिलांसोबत तिच्या झोपडीमध्ये 22 जानेवारी 2014 रोजी झोपलेली होती. या झोपडीला तुरीच्या काड्याचे दार असल्याने सदरचे दार उघडून आरोपी पुरुषोत्तम सूर्यभान तायडे याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली, त्यामुळे तिच्या वडील आणि भावाने धाव घेऊन आरोपी तायडे यास पकडले.तायडेने दोघांच्या तावडीतून सुटून जाण्यासाठी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत मुलीच्या वडिलांना लागल्यामुळे आरोपीस पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर अल्पवयीन मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी पुरुषोत्तम तायडे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 354 अ, 448 आणि पॉस्को कायद्याच्या कलम-8 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पीएसआय एस.एस. किनाके यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने सहा साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी तायडे यास पॉस्को कायद्यानुसार चार वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी तीन महिने शिक्षा, तर 354 अ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास, कलम 448 अन्वये एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षाकडून सरकारी विधिज्ञ अॅड. श्याम खोटरे यांनी कामकाज पाहिले.
आरोपी विकृत सवयीचा
शिक्षा झालेला आरोपी पुरुषोत्तम तायडे याने हिरपूर येथीलच एक दाम्पत्य झोपलेले असताना त्यांच्या घरात प्रवेश करून विवाहित महिलेचा विनयभंग 31 ऑक्टोबर 2014 रोजी केला होता. यावरून आरोपीची बुद्धी विकृत असल्याचे न्यायालयाने सांगत आरोपीला ही सवयच असल्याचे स्पष्ट केले. विवाहितेच्या विनयभंग प्रकरणातही आरोपीविरुद्ध 354 अ, 452, 506 नुसार गुन्हा दाखल असून, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.