पावसात ‘बाप्पा मोरया’चा गजर
By admin | Published: September 18, 2015 01:02 AM2015-09-18T01:02:01+5:302015-09-18T01:02:01+5:30
अकोला जिल्ह्यात श्रींचे जल्लोषात आगमन; पारंपरिक वाद्यांनी दुमदुमले शहर.
अकोला: अधून-मधून कोसळणारा पाऊस, पायाखाली चिखल अन् गुलालाची उधळण करून ह्यबाप्पा मोरयाह्णच्या गजरात श्रींचे राजराजेश्वर नगरासह जिल्ह्यात गुरुवारी जल्लोषात आगमन झाले. श्रींच्या स्वागतासाठी जिल्ह्याभर चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत तसेच महिलांचाही उत्साहात सहभाग दिसून आला. गुरुवारी वरुण राजाने राजराजेश्वर नगरासह जिल्ह्यात सकाळपासूनच हजेरी लावून श्रींचे स्वागत केले. पावसाच्या सरी आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शहरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली. या भक्तिमय वातावरणात गुलालाची उधळण करून ह्यबाप्पा मोरयाह्णच्या जयघोषाने अकोलेकरांनी मोठय़ा उत्साहात बाप्पांचे स्वागत केले. मागील दोन दिवसांपासून शहरातील अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानामध्ये श्रींच्या मूर्ती विक्रीची बाजारपेठ सजली होती. पावसामुळे बाजारपेठेत सर्वत्र चिखल अन् डबके साचल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती; परंतु पावसातही नागरिकांचा उत्साह वाढत असल्याने बाजारपेठेला नवचैतन्य प्राप्त झाले. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच ढोल ताशांच्या निनादात श्रींचे आगमन केले. पावसामुळे श्रींची मूर्ती ओली होऊ नये म्हणून नागरिकांनी प्लास्टिकचा सहारा घेतल्याचे चित्र दिसून आले. तसेच शहरासह जवळपासच्या ग्रामीण भागातील नागरिकही एसटी बसमध्ये श्रींची मूर्ती नेताना दिसून आले. महिलांचा सहभाग लक्षणीय यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठेत चिमुकली मुले, वृद्धांसह महिला वर्गातही उत्साह दिसून आला. घरगुती गणेशाच्या स्वागतासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही यंदा महिलांचा सहभाग दिसून आला.
*वाहतुकीची कोंडी
स्टेशन रोड मार्गावरील अकोला क्रिकेट क्लबवर गणेश मूर्ती विक्रीची बाजारपेठ सजली होती; परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरात पार्किंगची सुविधा करण्यात आली नाही. परिणामी या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, टॉवर चौक ते अग्रसेन चौकपर्यंत रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
*चोख पोलीस बंदोबस्त
श्रींच्या स्वागतासाठी बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता बाजारपेठ परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. असे असले तरी वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक शाखेच्या मोजक्याच पोलीस कर्मचार्यांवर सोपविण्यात आली होती. या व्यतिरिक्त शहरातील इतर भागात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी या अनुषंगाने शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.