दारु बंदी : स्वाक्षरींच्या पडताळणीसाठी महिलांची गर्दी
By admin | Published: July 9, 2017 02:38 PM2017-07-09T14:38:41+5:302017-07-09T14:38:41+5:30
येथील परशुराम नाईक विद्यालयात संबंधित महसूल व उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पडताळणी होत आहे.
बोरगाव मंजू (अकोला) : गावातील देशी दारु दुकाने बंद करण्यासाठी बोरगावमंजू येथील महिला व संघर्ष समितीने आंदोलन छेडले आहे. एकूण महिला मतदार संख्या ५,९४४ एवढी असून, दारुबंदीकरिता मतदान घेण्यात यावे, याकरिता ४,५00 महिलांनी निवेदनावर सह्या करून वरिष्ठांना निवेदन दिले होते. नियमाप्रमाणे २५ टक्के महिलांच्या सह्यांची पडताळणी करणे क्रमप्राप्त असल्याने ९ जुलै, रविवारी येथील परशुराम नाईक विद्यालयात संबंधित महसूल व उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पडताळणी होत आहे. २५ टक्के महिलांच्या सह्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी महिलांची मोठी झुंबड उडाली आहे. दारू दुकान बंद झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निश्चय महिलांनी केला आहे.
महामार्गावरील न्यायालयाच्या आदेशाने बंद झालेले मद्यविक्रीचे दुकान शहरात स्थानांतरित करू नये,अशी मागणी बोरगाव मंजू येथील महिला व ग्रामस्थांनी केली होती, तसेच या दुकानांचा विरोध करूनही संबंधित विभागाने नव्याने मद्यविक्री दुकाने स्थानांतरित करण्याकरिता परवानगी दिली. त्यामुळे, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. तेव्हा ५0 टक्के महिलांनी दारुबंदी विरोधात मतदान केल्यास ही दुकाने कायमची बंद होतील, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. दरम्यान, २९ जून रोजी ४,५00 महिलांच्या सह्यांचे निवेदन देऊन प्रत्यक्ष मतदान घ्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, दारू उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याकडे केली होती.