एकेकाळचे मद्यपीच सोडवितात स्वानुभावातून मद्यपींची दारू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 02:54 PM2019-01-02T14:54:24+5:302019-01-02T14:57:44+5:30
एकेकाळी मद्यपाशात अडकलेल्या मद्यपींनीच स्वानुभावातून मद्यपानाच्या अतिआहारी गेलेल्या मद्यपींची दारू सोडविण्याचा विडा उचलला आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: मद्यपानामुळे घराची वाताहत होत आहे. कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. मद्यपींमुळे कुटुंबाला, पत्नी, मुलांना त्रास सहन करावा लागतो. घरात दररोज भांडण, वाद, संशय, मारझोड या प्रकारांना अक्षरश: महिला कंटाळतात. पतीची दारू सुटण्यासाठी महिला सर्वच उपाय करून पाहतात; परंतु फायदा होत नाही. यावर आता एकेकाळी मद्यपाशात अडकलेल्या मद्यपींनीच स्वानुभावातून मद्यपानाच्या अतिआहारी गेलेल्या मद्यपींची दारू सोडविण्याचा विडा उचलला आहे.
मद्यपान कसे वाईट, कसे जीवन उद्ध्वस्त करणारे, समाजात सतत अपमानित वाट्याला आणणारे आहे. हे स्वानुभावातून सांगण्यासाठी अकोल्यात अल्कोहोलिक्स अॅनानिमस आस्था समूह कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाºया या समूहाची स्थापना २0११ मध्ये राजेश एन. आणि विजय के. यांनी केली. एकेकाळी मद्यपाशाच्या गर्तेत अडकलेल्या या दोघांनी जागोजागी अपमान, आयुष्य व सर्वस्वाची राखरांगोळी होत असल्याचा अनुभव घेतला आणि या अनुभवातून धडे घेत, व्यसनावर मात केली. दोघांनीही आठ-दहा वर्षांपासून दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही. मद्यपाशातून मुक्त झालेल्या या दोघांनी आता अल्कोहोलिक्स अॅनानिमस आस्था समूहाच्या माध्यमातून मद्यपींची मद्यपाशातून सुटका करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथे समुपदेशन होत नाही तर मद्यपी आपल्या जुन्या अनुभवांची देवाण-घेवाण करतात. आपण पूर्वी कसे होतो, कसे आणि किती मद्यपान करायचो, त्यातून कसा बाहेर पडलो, तेव्हाच्या आणि आताच्या आयुष्यात काय बदल झाला, अशा विचारांची अनुभव कथन होते. एखादा मद्यपीच दुसºया मद्यपीची भावना योग्यरीत्या समजून, त्याला स्वानुभवातून व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करतात. वैद्यकीय औषधोपचाराशिवायही मद्यपानापासून दूर राहणे शक्य आहे आणि तेही स्वानुभवातून. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारल्या जात नाही. केवळ सेवाभाव म्हणून हा कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे.
येथे भरते नियमित सभा
अल्कोहोलिक्स अॅनानिमस आस्था समूहाची नियमित सभा पाच दिवस चिवचिव बाजाराजवळील मनपा शाळा क्र. ४ येथे होते. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता आणि रविवारी सकाळी १0 मनपा शाळा क्र. ४ मध्ये, विवेकानंद आश्रम सुधीर कॉलनी येथे सोमवारी व शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता तर आधार समूह जि.प. शाळा खडकी येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता, मूर्तिजापूर येथील दिशा समूहातर्फे जे.बी. हिंदी हायस्कूल बसस्टॅडजवळ बुधवारी व शनिवारी सायंकाळी सभा होते.
सभेत दारू पिऊन येण्यास बंधन नाही!
स्वानुभवच मद्यपानाच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी प्रभावशाली आहे. सभेला येणाऱ्यांनी स्वत:ची ओळख सांगावी, दारू पिऊन येऊ नये, असे बंधन नाही. दारू पिऊन आलेल्या हाकलून दिल्या जात नाही. उलट येथे सर्वांचे नाव, हुद्दा, आडनाव गोपनीय ठेवले जाते. आम्ही सारे मद्यपी आहोत आणि मद्यपानाच्या आजाराने ग्रासलेले रुग्ण आहोत, ही भावना निर्माण करून मद्यपानापासून एकमेकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न येथे केला जातो. अकोला जिल्ह्यात आस्था समूहाचे १५0 च्यावर सदस्य आहेत. सद्यस्थितीत अनेक जण बरे होऊन आनंदी जीवन जगत आहेत.
मद्यपान हे व्यसन नसून, आजार आहे. त्यासाठी मानसिक उपचाराची गरज आहे. एक मद्यपीच दुसºया मद्यपीच्या भावना समजू शकतो. स्वानुभवातून मद्यपाशातून मद्यपींची सुटका करण्यासाठी सेवा भावनेतून हे कार्य आम्ही करीत आहोत.
-राजेश एन.