डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सर्वच दवाखाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 02:42 PM2019-06-16T14:42:14+5:302019-06-16T14:42:19+5:30
१७ जून रोजी जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये व दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय ‘आयएमए’ने घेतला आहे. या निर्णयामुळे सोमवारी जिल्ह्यातील रुग्णसेवा कोलमडणार आहे.
अकोला : कोलकाता येथील एन.आर.एस. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉ. परिभा मुखर्जी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार, १७ जून रोजी जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये व दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय ‘आयएमए’ने घेतला आहे. या निर्णयामुळे सोमवारी जिल्ह्यातील रुग्णसेवा कोलमडणार आहे.
डॉक्टरांवर वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ वारंवार आंदोलन करून केंद्रीय कायद्याची मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे; मात्र अद्याप यावर कुठलाच ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. अशातच कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाइकांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी देशभरात डॉक्टरांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध केला. सोबत डॉक्टरांवरील हल्ला प्रतिबंध कायद्याची मागणी केली. केंद्र शासनाने आरोग्य आस्थापनावर होणाऱ्या हिंसाचारावर अंकुश लावण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे, ही मागणी जोर धरत आहे. यासाठी सोमवार, १७ जून रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये व दवाखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात ठेवून रुग्णांनी सहकार्य करावे, असे आवाहन आय.एम.ए. अकोलाचे अध्यक्ष डॉ. शशिकांत मोरे, सचिव डॉ. पराग डोईफोडे, डॉ. अजयसिंग चव्हाण, डॉ. रणजीत देशमुख, डॉ. सत्येन मंत्री, डॉ. आशिष डेहेनकर, डॉ. प्रशांत मुळावकर, डॉ. सुनीता लढ्ढा, डॉ. साधना लोटे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
अत्यावश्यक सेवा सुरू
डॉक्टरांचे आंदोलन रुग्णांच्या जीवावर बेतू नये, यानुषंगाने अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहणार असल्याचे आय.एम.ए.ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे किरकोळ रुग्णसेवा बंद असली, तरी अत्यावश्यक रुग्णसेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.