विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:17 AM2020-09-30T10:17:59+5:302020-09-30T10:18:06+5:30
संप मिटल्यावरच नव्याने परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले जाणार आहे.
अकोला : कोरोनामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सर्वच परीक्षा रेंगाळल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर या परीक्षा १ आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या. राज्यात अकृषी विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या परीक्षा पुन्हा रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचाºयांचा संप मिटल्यावरच नव्याने परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले जाणार आहे.
यंदा कोरोनामुळे महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तळ्यात-मळ्यात होत्या. परीक्षा होणार की नाही, हे कोडे न्यायालयाच्या निर्णयानंतर सुटले. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाच्या तयारीलाही लागले होते. १ आॅक्टोबर व त्यानंतरही काही विषयाच्या महाविद्यालयातून परीक्षा सुरू होणार होत्या; मात्र राज्यात सातवा वेतन आयोग आणि आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात या शिवाय, इतर मागण्यांसाठी राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचाºयांनी संप पुकारला. कर्मचारी संपावर असल्याने या परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या असून, संप मिटल्यावर परीक्षेचे नवे वेळापत्रक घोषित केले जाणार असल्याची माहिती आहे.
महाविद्यालयांना विद्यापीठाचे पत्र
१ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या संदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे सर्वच संलग्नित महाविद्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
आधी कोरोना अन् आता महाविद्यालयीन कर्मचाºयांचा संप या कारणामुळे यंदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रखडल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.