भांबेरी हत्याकांडातील चारही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:15 AM2021-05-31T04:15:19+5:302021-05-31T04:15:19+5:30
भांबेरी येथे आपसीवादाच्या कारणावरून शनिवार, दि. २९ रोजी दुहेरी हत्याकांड घडले होते. प्राणघातक हल्ल्यात देविदास भोजने व अजय भोजने ...
भांबेरी येथे आपसीवादाच्या कारणावरून शनिवार, दि. २९ रोजी दुहेरी हत्याकांड घडले होते. प्राणघातक हल्ल्यात देविदास भोजने व अजय भोजने या बाप-लेकाचा मृत्यू झाला होता, तर त्यांच्याच कुटुंबातील प्रमिला देविदास भोजने व विजय भोजने हे जखमी झाले होते. एकाच कुटुंबातील चारही जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली होती. आरोपी भीमराव गणपत भोजने, दर्शन भीमराव भोजने, राजेश गणपत भोजने, प्रमिला भीमराव भोजने यांनी शस्त्रहल्ला चढवित देविदास भोजने व त्यांचा मुलगा अजय भोजने यांची हत्या केली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी धाव घेत काही तासात आरोपी भीमराव गणपत भोजने, दर्शन भीमराव भोजने, राजेश गणपत भोजने, प्रमिला भीमराव भोजने यांना अटक केली.
रविवार, दि. ३० मे रोजी चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दि. २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.
---------------------------
दीड वर्षाच्या चिमुकलीचे हरवले छत्र!
दुहेरी हत्याकांडातील मृतक अजय भोजने यांना दीड वर्षाची चिमुकली आहे. वडील व आबाजीची हत्या, तर काका गंभीर जखमी व आई पळून गेल्याने ती सध्या जखमी असलेल्या आजीकडे राहत आहे. या निरागस चिमुकलीचा काही दोष नसताना तिच्या वाट्याला आलेले दुःख बघून समाजात हळहळ व्यक्त होत आहे.