ग्रामस्थांना मारहाण करणाऱ्या चारही आरोपींना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 04:58 PM2020-04-19T16:58:47+5:302020-04-19T16:58:53+5:30
रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अकोला : कोरोनामुळे देशभर ‘लॉकडाउन’ असताना दहीगाव, सांगळूद, धोतर्डी, आपातापा परिसरातील ग्रामस्थांना पोलीस असल्याचे सांगून, रात्री विनाकारण मारहाण करणाºया कुख्यात गुंड अज्जू ठाकूर व किरण पांडे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक करून त्यांची वरात काढल्यानंतर या टोळीतील दीपक अघर्ते व कुणाल ठाकूर या दोघांना बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पीएसआय संतोष अघाव यांनी शनिवारी अटक केली. या चारही आरोपींंविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास करताना या आरोपींना अटक केली होती. त्यानंतर या आरोपींना बोरगाव मंजू पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी चारही आरोपींना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
जठारपेठ परिसरातील रहिवासी अज्जू ठाकूर तसेच किरण पांडे यांच्यासह दीपक अघर्ते आणि कुणाल ठाकूर हे गुंड प्रवृत्तीचे युवक ग्रामीण भागातील निरपराध ग्रामस्थांना विनाकारण मारहाण करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व पोलिसांना मिळाली; मात्र पोलिसांच्या हातात हे गुंड लागत नसल्याने पोलिसांनी ग्रामस्थांनाच जागरूक करीत त्यांचे व्हिडिओ तसेच छायाचित्र काढण्यास सांगितले. यावरून अज्जू ठाकूर, किरण पांडे, दीपक अघर्ते आणि कुणाल ठाकूर हे चार जण तीन दिवसांपूर्वी धोतर्डी तसेच सांगळूद येथील ग्रामस्थांना पोलीस असल्याचे सांगत मारहाण करण्यासाठी जाताच येथील ग्रामस्थांनी त्यांना पकडले व पोलिसांना माहिती दिली; मात्र काही वेळातच ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणाची तक्रार बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी या टोळीविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व त्यांच्या पथकाने शनिवारी अज्जू ठाकूर, किरण पांडे या आरोपींना अटक करून त्यांची वरात काढून सामान्यांमध्ये असलेली भीती संपविण्याचे काम केले. त्यानंतर बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पीएसआय संतोष आघाव यांनी दीपक अघर्ते आणि कुणाल ठाकूर या दोन आरोपींना अटक केल्यानंतर चारही आरोपींना बोरगाव मंजू पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.