अकोला जिल्ह्यातील चारही ब्रिटिशकालीन पूल धोकादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:20 PM2020-08-26T12:20:44+5:302020-08-26T12:21:13+5:30
बांधकाम विभागाने रस्ता निर्माण कार्यासाठी संबंधित राज्य महामार्ग व पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)कडे सोपविल्याची माहिती आहे.
- आशिष गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यातील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बनल्याचे समोर आल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. पुलांचे आॅडिट करण्यासाठी शासन स्तरावरून ‘एसजीसी’कन्सल्टन्सीची नियुक्ती करण्यात आली असता यामध्ये जिल्ह्यातील चार पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. आॅडिटमध्ये चारही ब्रिटिशकालीन पुलांचे आयुर्मान शिल्लक असले तरी दुरुस्तीअभावी धोकादायक बनल्याचे नमूद आहे. बांधकाम विभागाने रस्ता निर्माण कार्यासाठी संबंधित राज्य महामार्ग व पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)कडे सोपविल्याची माहिती आहे.
राज्यातील महाड-रायगड मार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याने २०१७ मध्ये मोठी जीवितहानी झाली होती. त्या पृष्ठभूमीवर तत्कालीन सरकारने ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. जिल्ह्यातील चार पुलांच्या आॅडिटसाठी एसजीसी कन्सल्टन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित कन्सल्टन्सीने पुलांचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही दिवसांपूर्वी सादर केला असून, त्यामध्ये चारही पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे नमूद करीत दुरुस्तीसाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. यादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्यावतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे निर्माण कार्य सुरू आहे.
त्यामुळे राज्य महामार्गावरील चारही पूल साबांविने ‘एनएचएआय’कडे हस्तांतरित केले आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम अतिशय संथगतीने होत असल्यामुळे ब्रिटिशकालीन पुलावरून होणारी वाहतूक लक्षात घेता अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र आहे.
पुलांची दर सहा महिन्यांनी तपासणी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व १७० पुलांची दर सहा महिन्यांतून तपासणी केली जाते. ब्रिटिशकालीन पूल वगळता इतर सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’कडे शुल्क जमा केल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय व राज्य मार्गाचे निर्माण कार्य ‘एनएचएआय’च्या माध्यमातून केले जात असल्याने ‘पीडब्ल्यूडी’ने ब्रिटिशकालीन पुलांचे हस्तांतरण केले आहे. चार पुलांपैकी गांधीग्राम व लोहारा येथील पुलाच्या ऐवजी नवीन पुलाची उभारणी केली जाईल. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया आटोपताच पुढील कामाला सुरुवात होईल.
-रावसाहेब झाल्टे, कार्यकारी अभियंता ‘एनएचएआय’