महान धरणाचे पुन्हा सर्व गेट उघडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 09:05 PM2020-09-18T21:05:39+5:302020-09-18T21:06:01+5:30
२९ तासात एकूण ११.२४७ दलघमी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग झाला आहे.
महान : महान धरणाचे वक्रद्वार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता बंद करण्यात आले होते. या वेळेस धरणात ३४७.५३ मीटर, ८२.४८४ दलघमी व ९५.५२ टक्के जलसाठा उपलब्ध होता; परंतु महान धरण पाणलोट क्षेत्रामध्ये व मालेगाव परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने तब्बल १८ दिवसांनंतर १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.३० वाजता महान धरणाचा जलसाठा ३४७.७० मीटर, ८५.१२४ दलघमी व ९५.५८ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यामुळे महान धरणातील 10 दरवाजे उघडण्यात आले.
काटा कोंडाळा नदीमधील पाण्याचा वेग दमदार सुरू असल्याने महान धरणाच्या पाणी पातळीत चांगल्याच प्रमाणात वाढ होत होती. पावसाचा अंदाज व पाणी पातळीत होत असलेल्या वाढीकडे लक्ष देऊन महान धरणाचे १६ सप्टेंबरच्या रात्री १.३० वाजता सर्व १० वक्रद्वार एक फुटाने उघडून एकूण २५५.८३ घनमीटर प्रतिसेकंदाने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. धरणाचे वक्रद्वार उडून पाण्याचा विसर्ग करण्याची ४७ दिवसात ही बारावी वेळ आहे. १ जून ते १८ सप्टेंबर सकाळपर्यंत एकूण ५८०.३ मिमी. पावसाची नोंद महान पाटबंधारे विभागात करण्यात आली आहे. मालेगाव परिसरातून वाहत येणारी काटा कोंडाळा नदीची दुथडी भरमसाठ वाहत असल्याने महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ होणे सुरूच आहे. १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.३० वाजता महान धरणाचे सर्व दहाही दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले होते. त्यामधील काही गेट टप्प्याटप्प्याने बंद करून चार गेट सुरू होते. धरणाची पाणी पातळी १८ सप्टेंबर रोजी पहाटे ६.३० वाजता ९५.८८ टक्क्यांवर आल्याने सुरू असलेले सर्वच गेट सकाळी ६.३० वाजता तब्बल २९ तासानंतर बंद करण्यात आले असून, २९ तासात एकूण ११.२४७ दलघमी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग झाला आहे. पाणी पातळीकडे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता नीलेश घारे, जानोरकार, पिंपळकर, पाठक, हातोलकर, झळके, टेमझरे लक्ष ठेवून नियोजन करीत आहेत.