बालवाडीचे वर्ग सुरू करण्यासाठी सर्वपक्षीय गटनेता एकवटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:07 PM2019-02-22T13:07:45+5:302019-02-22T13:07:50+5:30
अकोला : महापालिकेच्या शाळेत अंगणवाडी सुरू क रण्याचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्यानंतर मनपा प्रशासनाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग नव्याने ...
अकोला: महापालिकेच्या शाळेत अंगणवाडी सुरू क रण्याचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्यानंतर मनपा प्रशासनाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग नव्याने सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सर्वपक्षीय गटनेता एकवटल्याचे चित्र समोर आले. खुद्द सत्तापक्ष भाजप, शिवसेना, काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघाच्या गटनेत्यांनी तसेच उपमहापौर वैशाली शेळके यांनी प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून येत्या शैक्षणिक सत्रापासून बालवाडीचे वर्ग सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे.
शहरातील गोरगरीब कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधील महागडे शिक्षण घेणे परवडत नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मनपा शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडी सुरू करण्यासोबतच त्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी ३३ सेविका व ३३ मदतनीस यांची भरती प्रक्रिया राबवून नियुक्ती केली होती. २०१७ मध्ये सुरू झालेल्या बालवाडीच्या वर्गांना सर्वसामान्य अकोलेकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. २०१८ मध्ये संबंधित सेविका, मदतनीस यांना मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक मनपा शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंगणवाड्यांचे मनपा शाळेत स्थानांतरण करण्याचे निर्देश बालविकास विभागाच्या आयुक्तांनी दिले. त्यानुषंगाने बालविकास विभाग व मनपाच्या संयुक्तिक सर्व्हेनंतर मनपाच्या ३३ पैकी फक्त पाच शाळांमध्ये अंगणवाडी सुरू करता येणार असल्याचे समोर आले. मनपाच्या संपूर्ण ३३ शाळांमध्ये अंगणवाडी सुरू होणार असल्याची मनपा प्रशासनाला अपेक्षा असल्याने बालवाडीच्या वर्गांवरील सेविका व मदतनीस यांना मुदतवाढ देण्यात आली नाही. परिणामी, आपसूकच बालवाडीचे वर्ग बंद झाले. त्यानंतर अंगणवाडीच्या प्रस्तावाला खीळ बसली. त्यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेता यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बालवाडीचे वर्ग सुरू करण्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले असता, या मुद्यावर सर्वपक्षीय गटनेता एकवटल्याचे दिसून आले.
चिमुकल्या विद्यार्थ्यांचा विचार व्हावा!
उपमहापौर वैशाली शेळके, भाजपाचे गटनेता राहुल देशमुख, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजीद खान पठाण, भारिप-बमसंच्या गटनेत्या अॅड. धनश्री देव यांनी मनपाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. आयुक्त संजय कापडणीस यांनी सर्वसामान्य कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा सकारात्मक विचार करावा, असे पत्राद्वारे नमूद करण्यात आले आहे.