सारे नियम बाटलीत !
By admin | Published: November 7, 2014 01:05 AM2014-11-07T01:05:07+5:302014-11-07T01:05:07+5:30
अकोला शहरातील प्रकार, अल्पवयीन मुलांचा दारूचे पार्सल आणण्यासाठी होतोय वापर.
नितीन गव्हाळे / अकोला
शासनाने कितीही कडक कायदे बनविले तरी त्यातून पळवाटा शोधल्या जातात. कायदे मोडण्यासाठीच बनविले जातात की काय, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. दारूविक्रीसंदर्भात घालून दिलेले नियमांचे उल्लंघन शहरातील देशी व विदेशी दारू विक्रे त्यांकडून होत आहे. अल्पवयीन मुलांना दारू विकू नये, असा नियम आहे. हा नियम एकाही वाइन बार, बीअर बार आणि देशी व विदेशी दारू विक्री दुकानांमध्ये पाळला जात नाही. लहान मुलांकरवी दारूचे पार्सल मागवले-आणले जाते. अशाप्रकारे नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे चित्र शहरामध्ये दिसून येते.
गुरुवारी लोकमत चमूने स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंग ऑपरेशनदरम्यान शहरातील रेल्वे स् थानक चौकातील वाइन शॉपसह परिसरातील वाइन बार, रतनलाल प्लॉट चौकातील बीअर शॉपी व वाइन शॉप तसेच टिळक रोडवरील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोरील वाइन शॉपमध्ये अल्पवयीन मुलांच्या हातात देशी व विदेशी दारूचे पार्सल देताना दारूविक्रेते आढळून आले. दारूच्या बाटल्यांच्या पार्सल आणण्यासाठी लहान मुलांचा सर्रास वापर होत असल्याच्या मुद्दय़ाला लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमधून बळच मिळाले. दारूच्या पार्सलमुळे मुलांमध्ये व्यसनाधीनता बळावू शकते, याचा विचार दारूविक्रेतेही करीत नाही आणि मुलांचे पालकही करीत नाहीत. नियम बाटलीत बुडवून दारूविक्रेते बिनधास्त पणे मुलांजवळ दारू देऊन मोकळे होतात. वाइन बारमध्येसुद्धा लहान मुलांचा दारू आणण्यासाठी व ती पोहोचविण्यासाठी वापर केला जातो. दारूसारख्या जीवघेण्या व्यसना पासून मुलांना दूर ठेवण्याची जबाबदारी केवळ पालकांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची आहे; मात्र, दुर्दैवाने त्याकडे कुणाचेही लक्ष अद्याप गेलेले नाही.
*वाइन शॉप नव्हे, मद्यप्राशन केंद्रे!
राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाइन शॉपला केवळ देशी व विदेशी दारूविक्रीचा परवाना दिला. परंतु, वाइन शॉपचालकाने विक्रीसोबतच दुकानामध्येच ग्राहकांना मद्यप्राशनाची सुविधा उपलब्ध केली. मद्य प्राशनासाठी ग्लास, पाण्याच्या बाटल्या, पाउच, कोल्ड्रिंक्स, चाट मसालासुद्धा येथे आहे. शहरातील काही वाइन शॉपमध्ये ग्राहक दारूच्या बाटल्या खरेदी करून दुकानामधील काउंटरवरच ग्लासमध्ये दारू रिचवून पितात. यावरही एकही वाइन शॉप चालक किंवा कर्मचारी आक्षेप घेताना दिसून येत नाही.
* कुठे केले स्टिंग ऑपरेशन?
चमूने रेल्वे स्थानक चौकातील वाइन शॉप, वाइन बार, रतनलाल प्लॉट चौकातील बीअर शॉपी व वाइन शॉपी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोरील व टिळक रोडवरील वाइन शॉपसमोर स्टिंग ऑपरेशन केले. या ठिकाणी सारे नियम बाटलीत उतरवून दारूविक्रेते अल्पवयीन मुलांच्या हातात दारूचे पार्सल देताना आढळून आले. राऊतवाडी भागातील एका वाइन शॉपमध्ये मात्र असा कुठलाही प्रकार आढळून आला नाही.
*राज्य उत्पादन शुल्क विभाग उदासीन
अल्पवयीन मुलांच्या हातात दारूचे पार्सल देण्याचे चित्र शहरातील बहुतांश वाइन व बीअर शॉपसमोर दिसून येते. अल्पवयीन मुलांना दारूची विक्री करण्यावर प्रतिबंध असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने आजपर्यंतही एकाही दारूविक्रेत्यावर यासंदर्भात कारवाई केली नाही किंवा त्यांचा परवाना रद्द केला नाही. नियमांची अंमलबजावणी करण्यात आणि नियमांचे दारूविक्रेत्यास पालन करण्यास सांगण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग उदासीन असल्याचे या स्टिंगमधून स्पष्ट झाले.
ड्राय डेकडे कानाडोळा
दारूविक्रेत्यांनीच नव्हे, तर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांनीसुद्धा सारे नियम बाटलीत रिचविल्याचे लोकमतच्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सण-उत्सवांच्या दिवशी दारूविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येतात. परंतु, या बंद कालावधीमध्येच सर्वाधिक दारूचा खप होतो. ड्राय डेला वाइन बार, वाइन शॉपमधून सर्रास दारूची विक्री होते, पाहणीतून स्पष्ट झाले.