शतप्रतिशत भाजपाला युतीधर्माचा अडसर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:19 PM2019-06-04T13:19:36+5:302019-06-04T13:19:45+5:30
युतीधर्म पाळण्यासाठी भाजपाला किमान दोन मतदारसंघ सेनेला देण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचे चित्र आहे.
अकोला: लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा मनाने अन् मोदी लाटेने एकत्र आल्यामुळे आता विधानसभेत युती कायम राहील यात कोणालाही शंका नाही. त्यामुळेच आता युतीधर्म पाळण्यासाठी भाजपाला किमान दोन मतदारसंघ सेनेला देण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचे चित्र आहे.
भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब फुंडकर यांनी त्यांच्या कार्यकाळात शतप्रतिशत भाजपा हा नारा दिला होता. यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये सत्ताकेंद्र ताब्यात घेण्यासाठी भाजपा सरसावली. त्यामध्ये अकोला अग्रेसर होता. अकोला जिल्ह्यात भाजपाने निर्माण केलेले एकहाती वर्चस्व हे भाजपाने स्वबळावर मिळविलेले यश ठरले. काँग्रेससारख्या मोठे नेटवर्क असलेल्या पक्षालाही भाजपासमोर नामोहरम व्हावे लागले, त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने स्वबळावर सर्व मतदारसंघ जिंकण्याची रणनीती आखत शतप्रतिशत भाजपा हा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी रणशिंग फुंकले होते; मात्र लोकसभेसाठी भाजपा, सेना एकत्र आल्याने आता भाजपाला स्वबळाचा नारा सोडून देत युतीधर्म पाळावा लागणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी युती मध्ये सर्वात आधी जागा वाटपाचा गुंता निर्माण होऊ शकतो. अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघां पैकी भाजपाने चार मतदारसंघात विजय मिळविला आहे. त्यामुळे सेनेला एक मतदारसंघ भाजपाला देणे सहज शक्य आहे; मात्र सेनेचा बाळापूर, अकोट अशा दोन मतदारसंघावर दावा आहे. तसेच अकोल्यातील शहरी मतदारसंघ असलेला अकोला पश्चिमही मिळावा, असे प्रयत्न आहेत. बाळापुरात भाजपाचे आमदार नसल्यामुळे हा मतदारसंघ सेनेला देण्यात भाजपाला अडचण येणार नाही; मात्र अकोट व अकोला पश्चिममध्ये भाजपाचे सर्वात ज्येष्ठ आमदार प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे ऐनवेळी
सेनेची एकाच मतदारसंघावर बोळवण होण्याची चिन्हे आहेत. असे झाले तर भाजपासमोर सेना बंडखोरांचे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाचे अकोल्यावर वर्चस्व असले तरी युतीमध्ये सेनेला तसेच घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामच्याही अपेक्षांचे ओझे भाजपावर राहणार आहे. त्यामुळे युती धर्म पाळण्यासाठी भाजपाला बॅकफुटवर यावे लागणार आहे.
अरविंद सावंत यांची करडी नजर
शिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणून खा. अरविंद सावंत यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत झाली. हेडमास्तरांच्या भूमिकेत सावंत यांनी शिवसैनिकांना शिस्त लावली. आता सावंत यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपविल्यामुळे त्यांच्याही शब्दाला अधिक वजन प्राप्त झाले आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या घडामोडीवर त्यांची करडी नजर राहणार असल्याने सेनेला सन्मानजनक वाटा मिळेल, अशी आशा शिवसैनिकांना आहे.