बँक खात्याच्या घोळात ३० टक्केच रकमेचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 02:11 PM2019-10-23T14:11:17+5:302019-10-23T14:11:36+5:30

महिला व बालकल्याण विभागाच्या तीन योजनांच्या ८७५ पैकी केवळ २५४ लाभार्थींनाच रकमेचे वाटप झाल्याची माहिती आहे.

Allocation of 30% in bank account solution | बँक खात्याच्या घोळात ३० टक्केच रकमेचे वाटप

बँक खात्याच्या घोळात ३० टक्केच रकमेचे वाटप

Next

अकोला: जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडे असलेल्या उपकराच्या योजनांचा लाभ तातडीने लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याची घिसाडघाई सुरू असतानाच बँक खात्यांमुळे योजनांचा लाभ देण्यात प्रशासनाची अडथळ््याची शर्यत सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या तीन योजनांच्या ८७५ पैकी केवळ २५४ लाभार्थींनाच रकमेचे वाटप झाल्याची माहिती आहे. उर्वरित लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी विविध अडचणींचा सामना सुरू आहे.
महिला व बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन, समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ थेट हस्तांतरण पद्धतीने देण्याला सुरुवात झाली. ती रक्कम ३१ आॅक्टोबरपर्यंत लाभार्थींपर्यत पोहचलीच पाहिजे, अशी तयार प्रशासनाची आहे; मात्र रक्कम खात्यात जमा होण्यासाठी लाभार्थींसह प्रशासनही कमालीचे अडचणीत असल्याचे पुढे येत आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या शिलाई मशीनसाठी ५६९, सायकल-१३०, पीको मशीन-१७६ लाभार्थी आहेत. त्यापैकी २५४ लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा झाली. उर्वरित लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा करण्याची कसरत सुरू आहे. या लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी अफलातून अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलींसाठी सायकल असल्याने लाभ घेण्यासाठी त्यांनी पालकाचे बँक खाते दिले आहे. शिलाई मशीन, पिको मशीनसाठी महिलांनी पतीचे बँक खाते दिले आहे. या प्रकाराने लाभार्थी आणि खातेधारकाच्या नावात तफावत दिसत आहे. रक्कम लाभार्थीच्या नावेच जमा करावी लागणार आहे. त्यामुळे तफावत असलेल्या नावे रक्कम जमा करता येणार नाही, असा पवित्रा बँकांनी घेतला. या अडचणीला सामोरे जाताना आता लाभार्थींसह प्रशासनाचीही दमछाक होत आहे. त्याच वेळी ३१ आॅक्टोबरची मुदत असल्याने पंचायत समिती स्तरावरच्या यंत्रणेची कमालीची फरपट होत आहे. त्यातच लाभार्थींशी संपर्क साधून खाते बदलवून घेण्यातही आता बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे ३१ आॅक्टोबरच्या मुदतीत लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होणे अशक्य असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

Web Title: Allocation of 30% in bank account solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.