वसतिगृह अनुदान वाटप; जबाबदारी ठरणार!
By admin | Published: November 4, 2016 02:25 AM2016-11-04T02:25:33+5:302016-11-04T02:25:33+5:30
अतिरिक्त सीईओ करणार ‘शो कॉज’च्या स्पष्टीकरणाची तपासणी.
अकोला, दि. ३- समाजकल्याण विभागातून १४ वसतिगृहांना नियमबाहय़पणे वाटप केलेल्या निधीबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेल्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी नागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी खिल्लारे यांच्यासह कर्मचार्यांची जबाबदारी निश्चित केली जात आहे. त्यांच्या स्पष्टीकरणाची फाइल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांच्याकडे दिल्याची माहिती आहे.
समाजकल्याण विभागातून ऑक्टोबरच्या सुरुवातीला १४ वसतिगृहांना लाखोंचे अनुदान देण्यात आले. ते देताना शासन निर्णय, आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवण्यात आले. प्राथमिक चौकशीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांना अंधारात ठेवत अनुदान वाटप करण्यात आले. तर कार्यालयीन प्रक्रियेतही मोठय़ा प्रमाणात अनियमितता केल्याचे उघड झाले. त्यासाठी जबाबदार असलेल्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, प्रभारी समाजकल्याण अधिकारी व्ही.के. खिल्लारे, सहायक लेखाधिकारी आर.एम. थोरात, अधीक्षक खारोडे, कनिष्ठ सहायक हिंगणे यांना कारणे दाखवा नोटीस २४ ऑक्टोबर रोजी बजावण्यात आली. त्याचे स्पष्टीकरण सर्व संबंधितांनी सादर केले आहे. अनुदान वाटप करताना नेमके काय घडले, कुणाची काय जबाबदारी होती. त्यांनी ती पार पाडली की नाही, ही सर्व मुद्दे विचारात घेऊन तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुकाअ विधळे यांनी दिले.
वसतिगृह तपासणीचे स्वतंत्र अहवाल मागवले!
वसतिगृह अनुदान वाटपात झालेल्या घोळाची पडताळणी करण्यासाठी गेल्या २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एकाचवेळी जिल्हय़ातील ५१ वसतिगृहांत अधिकार्यांच्या पथकांनी धाव घेत तपासणी केली. त्या तपासणीत स्पष्ट झालेल्या मुद्यांचा अहवाल वसतिगृहांच्या स्वतंत्र फायलीसह सादर करा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी समाजकल्याण अधिकारी शरद चव्हाण यांना बुधवारी दिले.
अनुदान वाटपात झालेल्या अनियमिततेला जबाबदार असलेल्या कर्मचार्यांवर कारवाई निश्चित होईल. अधिकारी दोषी असतील, तर त्यांच्या विभागाकडे कारवाईचा प्रस्ताव सादर केला जाईल.
- अरुण विधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.