जागा वाटपाचा तिढा कायम; मात्र राकॉँकडून प्रचाराला प्रारंभ
By admin | Published: September 22, 2014 01:16 AM2014-09-22T01:16:53+5:302014-09-22T01:16:53+5:30
अकोला जिल्हय़ातील राकाँचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय.
अकोला : काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाबाबतचा तिढा सुटला नाही, त्यामुळे अगोदरच कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असताना, राकाँचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी जागांचा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसला तीस तासांचा अल्टिमेटम दिल्यामुळे जिल्हय़ातील राकाँचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. रविवारी हक्काच्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात राकॉँने प्रचाराला सुरुवात केली. इतर मतदारसंघातही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रुफुल्ल पटेल यांच्या अल्टिमेटमनंतर काँग्रेसने रविवारी पत्रकार परिषद घेऊन १२४ जागा राष्ट्रवादीला सोडण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. तथापि यावर राकाँ नेत्यांकडून सायंकाळपर्यंत कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती. रविवारी जिल्हय़ातील प्रमुख नेते या मतदारसंघाच्या दौर्यावर होते. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले नसले तरी, या मतदारसंघातही कामाला सुरुवात झाली असून, जिल्हय़ातील सर्वच मतदारसंघातील उमेदवारही कामाला लागले आहेत. सध्या जाहीर प्रचाराला सुरुवात झाली नसली तरी भेटीगाठी व घरगुती बैठकांवर भर दिला जात आहे.