बेरोजगार अभियंत्यांना १.८३ कोटींच्या कामाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:03 PM2019-09-06T18:03:00+5:302019-09-06T18:03:04+5:30
महावितरणने अकोला मंडल कार्यालयाअंतर्गत करावयाच्या १ कोटी ८३ लाख रुपयांच्या कामांचे वाटप २९ अभियंत्यांना गुरुवारी केले.
अकोला : बेरोजगार विद्युत अभियंत्यांना थेट लॉटरी पद्धतीने काम देण्याच्या धोरणाच्या अनुषंगाने महावितरणनेअकोला मंडल कार्यालयाअंतर्गत करावयाच्या १ कोटी ८३ लाख रुपयांच्या कामांचे वाटप २९ अभियंत्यांना गुरुवारी केले.
महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्यालय ' विद्युत भवन 'येथे आमंत्रित बेरोजगार अभियंत्यांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने या कामांचे वाटप करण्यात आले. यात जिल्हा विकास नियोजनातून अकोला ग्रामीण विभागात करावयाचा कामाचा समावेश आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या उपस्थितीत बेरोजगार अभियंतांना द्यावयाच्या कामाच्या लॉटरीची सोडत करण्यात आली. यात आमंत्रित केलेल्या २९ बेरोजगार अभियंत्यांना सुमारे १ . ८३ कोटींच्या कामाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अभियंता गोर्ले यांच्यासह सर्व बेरोजगार अभियंते उपस्थित होते.
अकोला मंडळ कार्यालयाने गत चार वर्षात २९ सुशिक्षीत बेरोजगार अभियंताना सुमारे ४.२ कोटीची विजेची कामे देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. अकोला मंडळ कार्यालयात रोजगार मिळावे म्हणून ३५ सुशिक्षीत बेरोजगार अभियंतानी आपल्या नावाची नोंदणी केलेली आहे.
बेरोजगार अभियंत्यांना १० लाख रुपयापर्यंतची कामांची लॉटरी
विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविकाधारक बेरोजगार अभियंत्यांना महावितरणतर्फे १० लाख रुपयापर्यंतची कामे बिना स्पर्धा थेट लॉटरी पद्धतीने देण्याचे धोरण आहे . या धोरणानुसार वर्षभरात एका अभियंत्याला १० लाख रुपयाची ५ अशी एकून ५० लाख रूपयाची कामे देण्यात येतात. ही कामे विहीत मुदतीत यशस्वीरित्या पुर्ण केल्यास पुढिल वर्षी १५ लाख रुपयापर्यंतची पाच अशी एकून ७५ लाख रूपयाची कामे लॉटरी पद्धतीने दिल्या जाणार आहेत. या धोरणानुसार मागिल चार वर्षात राज्यातील शेकडो बेरोजगार अभियंत्यांना ११ हजार ८५२ लाखाची १ हजार ९९८ कामांचे वाटप करण्यात आले.