राज्यात महाआघाडी साथ साथ, जिल्ह्यातही एकमेकांना ठरताहेत पूरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:23 AM2021-08-13T04:23:20+5:302021-08-13T04:23:20+5:30
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात एकही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालेली नाही त्यामुळे या पक्षांच्या भूमिका सध्या तरी ...
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात एकही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालेली नाही त्यामुळे या पक्षांच्या भूमिका सध्या तरी एकमेकांना पूरक आहे. पूर्वी असलेल्या विराेधाची धार आता बऱ्याच प्रमाणात कमी झाली असून, शक्य झाले तर आघाडी करून लढायचे हाच प्रयत्न या पक्षांचा आहे त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून निर्णय आला नाही तर स्थानिक परिस्थिती पाहून महाविकास आघाडी अस्तित्वात येण्याचे संकेत आहेत.
पंचायत समिती
पातुर पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस या पक्षाची युती आहे. ही शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष आघाडीमध्ये लढले सभापतिपद काॅंग्रेसला, तर उपसभापती शिवसेनेचा, अकाेला बाळापुरातही हे पक्ष एकमेकांना पूरकच आहेत.
जिल्हा परिषद
सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र आले हाेते मात्र आकड्यांचा खेळ जमला नाही. आता तिघेही वंचितच्या विराेधात असले तरी सभागृहात सेनेच्या भूमिकेला थेट पाठिंबा देण्यात काॅंग्रेस राष्ट्रवादी कचरत असल्याचे दिसते. हे तीनही पक्ष साेयीची भूमिका घेताना दिसतात.
अकाेला महापालिका
अकोला : महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपच्या धोरणांना काँग्रेस व शिवसेनेचा कडवा विरोध असून, राष्ट्रवादीची भूमिका सुरुवातीपासूनच तळ्यात मळ्यात राहली आहे. वर्तमानस्थितीत विविध मुद्यांवर मनपाच्या सभागृहात काँग्रेस व शिवसेना एकत्र आले आहेत. आगामी मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी जन्माला येण्याची दाट शक्यता आहे.
............
तीन पक्ष तीन विचार
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचा प्रयत्न झाला हाेता. काॅंग्रेसने आघाडीसाठी झालेल्या बैठकांनाही हजेरी लावली मात्र काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिलेला स्वबळाचा नारा महाविकास आघाडी गठीत हाेण्यात अडचणीचा ठरला. स्थानिक नेते महाविकास आघाडीसाठी इच्छुक हाेते मात्र पक्षाच्या निर्णयाला मूक संमती देत जिल्हा परिषदेच्या रिंगणात स्वतंत्र उमेदवार देत स्वबळ जपले आहे.
शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीला आव्हान देण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेत जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडी गठित करण्यासाठी सकारात्मकता दाखविली. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी बैठकांचे सत्र घेतले मात्र काॅंग्रेसने स्वबळाचा नारा कायम ठेवला, शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र येत जागा वाटपाचा गुंता साेडवून एकत्रित उमेदवार जाहीर केलेले आहेत. राष्ट्रवादीला साेबत घेतानाही सेनेचा वरचष्मा राहील याचा प्रयत्न आमदार देशमुख यांनी कायम ठेवला.
राष्ट्रवादी काॅंग्रेसने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेसाेबत जाण्याची तयारी दर्शविली हाेती, मात्र ते गणित प्रत्यक्षात येऊ शकले नाही. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत स्वत:चे अस्तित्व कायम राहील याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. त्यामुळे काॅंग्रेस किंवा सेनेच्या मागे फरफट टाळण्यासाठी अनेकदा साेयाची भूमिका घेतल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीबाबत राष्ट्रवादी अनुकूल असल्याने महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे.