तापत्या उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके; उपाययोजनांची कामे पूर्ण होणार कधी?
By संतोष येलकर | Published: March 10, 2024 06:18 PM2024-03-10T18:18:57+5:302024-03-10T18:19:27+5:30
पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण
संतोष येलकर, अकोला: तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, ग्रामीण भागातील काही गावात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना, पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी ९ मार्चपर्यंत केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित ५१८ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी असल्याचे वास्तव आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे पूर्ण होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यंदाच्या गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, उन्हाळ्यात जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी दोन महिन्यांपूर्वी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील २३८ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ५५० उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली. तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली असून, तापत्या उन्हात काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली असताना पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांपैकी ९ मार्चपर्यंत केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित उपाययोजनांची कामे पूर्ण होणे अद्याप बाकी असल्याने, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण होणार कधी आणि पाणीटंचाईच्या समस्येचे निवारण होणार कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
प्रशासकीय मान्यता ४८ उपाययोजनांना; ३२ कामे पूर्ण !
४ कोटी ५० लाख ९७ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी यंत्रणांच्या प्रस्तावानुसार आतापर्यंत ४८ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्ंत ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत ३२ कामे!
प्रशासकीय मान्यता मिळालेल्या ४८ उपाययोजनांपैकी आतापर्यंत जिल्ह्यात ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ३० कुपनलिकांसह एक विंधन विहीर व एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
पाणीटंचाईची समस्या आणखी होणार तीव्र?
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापत्या उन्हासोबतच विविध गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, त्यासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईइची तीव्रता आणखी वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.