आधीच कोरोना, त्यात 'व्हायरल' तापाची फणफण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:32 PM2020-09-26T17:32:00+5:302020-09-26T17:32:14+5:30
डॉक्टरांच्या सल्लाने कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
अकोला : मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे विविध आजारांनी डोके वर काढले असून, शहरात व्हायरल तापाची साथ सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताप, सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे अंगावर काढू नका, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच आता व्हायरल तापानेही डोके वर काढले आहे. ताप, अंगदुखी आणि डोकेदुखीच्या तक्रारी घेऊन रुग्ण खासगी रुग्णालयातून उपचार घेत आहेत. अनेकांमध्ये सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे आदी लक्षणेही दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाच्या काळात अशी लक्षणे अंगावर काढणे धोक्याचे ठरू शकते. आपल्या जवळच्या किंवा फॅमिली डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, डॉक्टरांच्या सल्लाने कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
व्हायरल फिव्हरमध्ये तीव्र ताप येतो. रुग्णाला थंडीही जाणवते. डोके आणि अंगदुखीचा त्रास होतो. त्यामुळे आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य औषधोपचार घ्यावा. सद्यस्थितीत अशी लक्षणे अंगावर काढू नये.
- डॉ. फारुख शेख, वैद्यकीय अधिकारी, महापालिका