आधीच कर्जबाजारी, त्यातच दुबार पेरणी : आर्थिक विवंचनेत असलेल्या दाम्पत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:52+5:302021-07-19T04:13:52+5:30
अकोट : आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर व अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे दुबार पेरणी करावी लागल्याने तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या शहापूर ...
अकोट : आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर व अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे दुबार पेरणी करावी लागल्याने तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या शहापूर रूपागड या गावात आर्थिक विवंचनेत असलेल्या एका दाम्पत्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना दि. १८ जुलै रोजी घडली.
हिवरखेड पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या शहापूर-रूपागड येथील मृतक पती सुरज तुकाराम भारसाकळे (वय ३५) व पत्नी कविता सुरज भारसाकळे (३०) यांच्याकडे जेमतेम अडीच एकर शेती असून, परिस्थिती हालाखीची आहे. यावर्षी त्यांनी शेतात निसर्गाच्या लहरीपणामुळे दुबार पेरणी केली. शिवाय कर्जाचा डोंगर वाढल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. याच चिंतेमुळे दोघांनी विषारी औषधप्राशन केले. घटनेची माहिती मिळताच त्यांना अकोट येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. प्रकृती ढासळत असल्याने त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आले, परंतु काळाने अकोला पोहोचण्यापूर्वीच झडप घातल्याने दोघांचा मृत्यू झाला. ‘लाॅकडाऊन’ काळात आर्थिक स्थिती बिकट झाली होती. अशातच कपाशी व तूर पिकाची दुबार पेरणी करावी लागली. त्यातच कर्ज, सतत आर्थिक परिस्थिती ढासळल्याने ते हतबल झाले होते, असे रुग्णालयात त्यांच्यासोबत असलेले पोपटखेड येथील नातेवाइक पांडुरंग तायडे यांनी सांगितले.
--------------------
तीन मुले झाले पोरके
मृतक सुरजच्या आई-वडील, भाऊ यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. सुरज हे पत्नीसह तीन मुलांबरोबर राहत होते. पती-पत्नीच्या आत्महत्येने त्यांच्या मागे असलेले लहान चिमुकले मुलगा व दोन मुली पोरके झाले आहेत.
---------------------
उप जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव
अकोट येथे उपजिल्हा रुग्णालय मंजुर केल्याची माहिती लोकप्रतिनीधींकडून नेहमी दिल्या जाते; मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय दर्जाचे कोणतेही सुविधा नसल्याने उपचार केल्या जात नाहीत. त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना उपचारासाठी अकोला येथे रेफर केले जाते. आज पुन्हा एका आदिवासी बांधव असलेल्या पती-पत्नीला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला. अकोट तालुक्याला सातपुडा जंगल परिसरातील आदिवासीबहुल गावे जोडली आहेत. सतत गंभीर घटना घडत असल्याने अकोट-अकोला रस्त्याची दुर्दशा व उपचाराअभावी अनेकांचे जीव गेले आहेत.
------------