ऑटोरिक्षाचालकांवर पर्यायी रोजगाराची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:41+5:302021-02-14T04:17:41+5:30
अकोला : गेल्या चार महिन्यांत पेट्रोल, डिझेलच्या दरांत मोठी वाढ झाली असून, पेट्रोलचे दर ९५ रुपये प्रतिलिटर, ...
अकोला : गेल्या चार महिन्यांत पेट्रोल, डिझेलच्या दरांत मोठी वाढ झाली असून, पेट्रोलचे दर ९५ रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचे दर ८४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. या इंधन दरवाढीचा फटका ऑटोरिक्षा चालविणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अपेक्षित कमाई होत नसल्याने अनेकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पर्यायी रोजगार शोधले आहेत.
अकोला जिल्ह्यात रोजगाराची समस्या गंभीर आहे. उद्योगांची वानवा असल्याने ५० टक्क्यांहून अधिक कामगारांना शेतीकामांचा आधार घ्यावा लागतो, तर हजारो लोक ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. दिवसभर बसस्थानक, रेल्वे स्टेशन शहरांतील मुख्य चौकात तास-तास प्रवाशांची वाट पाहणे किंवा ग्रामीण भागांत नियमानुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी ऑटोरिक्षाचालकांची मोठी धडपड होत असल्याचे चित्र रोज पाहायला मिळते. त्यात कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनच्या काळात ऑटोरिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. आता तो सुरळीत होण्यापूर्वीच शासनाकडून पेट्रोल, डिझेलच्या दरांत मोठी वाढ केली जात आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना पूर्वीच्या दरात प्रवाशांची वाहतूक करणेच परवडणारे राहिले नाही. जिल्ह्यात ऑटोरिक्षांची संख्या १० हजारांवर असून, त्यांना प्रवासी मिळणे कठीण होते. त्यामुळे या रिक्षाचालकांना आता ऑटो रिक्षा चालविणेच कठीण झाले आहे. दिवसभर ऑटो फिरवून २०० रुपयेसुद्धा कमाई होत नसल्याने अनेकांनी पर्यायी रोजगार शोधले आहेत. त्यात काहींनी भाजीपाला विक्रीचा व्यवसायही सुरू केला आहे.
दरवाढीमुळे व्यवसाय कठीण
बसस्थानकाहून जवळपास एक, दोन किलोमीटरच्या अंतरासाठी प्रतिप्रवासी दहा रुपये भाडे ऑटोरिक्षाचालक घेतात. अशीच स्थिती जिल्हाभरात आहे. तथापि, एवढ्या अंतरात दोन प्रवासी घेऊन गेल्यानंतर परत प्रवासी मिळणे कठीण होते.
दिवसभरात २०० रुपये कमाई
पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने ऑटोरिक्षाचालकांना व्यवसाय परवडणारा राहिला नाही. पूर्वी दिवसभर ऑटो चालविल्यानंतर त्यांना ४०० रुपयांपर्यंत कमाई होत असे; परंतु आता मात्र २०० रुपये कमाई होणेही कठीण आहे.
पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली. रिक्षांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रिक्षा चालविणे कठीण झाले आहे. भाड्यात वाढ केली तर प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑटोरिक्षा चालवून इतर कामे करावी लागत आहेत.
-
पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. प्रवासी भाडे मात्र पूर्वीएवढेच आहे. त्यामुळे हा व्यवसाय परवडणारा राहिला नाही. दोन किलोमीटर अंतरासाठी प्रत्येकी १० रुपयांप्रमाणे दोन प्रवासी घेऊन गेल्यानंतर रिकामे परत यावे लागते, तर ऑटोरिक्षांची संख्या अधिक असल्याने दुसरी फेरी मारण्यासाठी प्रवासीही मिळत नाहीत.
-
गेल्या महिनाभरात डिझेलचे दर ८४ रुपयांवर पोहोचले. प्रवासी भाड्यात मात्र काहीच वाढ झाली नाही. दिवसभर प्रतीक्षा करून १० फेऱ्यांसाठीही प्रवासी मिळणे कठीण आहे. त्यामुळे सकाळी ११ नंतर ऑटोरिक्षा चालवितो, तर त्यापूर्वी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विकतो. पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत असल्याने आता हा व्यवसाय परवडणारा राहिला नाही.
- रिक्षाचालक