नावात कडू असले, तरी कामातून गोडवा निर्माण करू - बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:47 PM2020-01-15T13:47:23+5:302020-01-15T13:47:38+5:30
नावात कडू असले तरी गोडवा निर्माण करू, असे आश्वासन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी बुधवारी मुर्तीजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी येथे ग्रामस्थांशी बोलताना दिले
अकोला : पालकमंत्री म्हणून काम करताना शासकीय योजनांचा लाभ सामान्य गरीब माणसापर्यंत पोहोचवू. हे काम करताना जात,पात, धर्म, पक्ष असा कोणताही भेद न बाळगता सर्वांना सोबत घेऊन काम करू. नावात कडू असले तरी गोडवा निर्माण करू, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास,शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी बुधवारी मुर्तीजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी येथे ग्रामस्थांशी बोलताना दिले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ही दिल्या.
ना.बच्चू कडू यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात राजनापूर खिनखिनी येथे दिव्यांगांच्या घराचे गृहप्रवेश व भूमिपूजन करून केली. या प्रसंगी ना.कडू यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी सरपंच प्रगती कडू, प्रांताधिकारी अभयसिंह मोहिते पाटील तसेच अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी ना.कडू यांनी पुरातन राजेश्वर शिव मंदिरात दर्शन घेतले. सत्कारानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सामान्य गोर गरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले शासन सतत प्रयत्न करेल. त्यासाठी लवकरच हेल्पलाईन सुविधा निर्माण केली जाईल. वेळेत आणि दजेर्दार सेवा देऊन उत्तम प्रशासनाचे उदाहरण घालून देऊ, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करू, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पहिला दौरा राजनापूर या गावात केला असल्याने हे गाव दत्तक घेतले असल्याची घोषणा केली.
यावेळी गावात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेतून बांधलेल्या दिव्यांग व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सुरेश शेजव, शुद्धोधन किर्दक, धनराज शेजव, मुंगुटराव शेजव यांच्या घरकुलाचा गृहप्रवेश व नव्याने बांधावयाच्या घरकुलाचे भूमिपूजन केले.