हौशी मराठी नाट्य स्पर्धा : कुप्रथेचे ‘काली’ मधून वास्तवात दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 02:10 PM2018-12-11T14:10:01+5:302018-12-11T14:10:17+5:30
अकोला : आजच्या विज्ञानवादी युगातही देशामध्ये कुप्रथाचे वर्चस्व कायम आहे. कुप्रथेची साखळी तुटता तुटत नाही. कन्या भ्रूणहत्या आजही या ...
अकोला: आजच्या विज्ञानवादी युगातही देशामध्ये कुप्रथाचे वर्चस्व कायम आहे. कुप्रथेची साखळी तुटता तुटत नाही. कन्या भ्रूणहत्या आजही या देशात अजूनही होत असल्याचे वास्तवात दर्शन ‘काली’ या नाटकातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले. सत्यघटनेवर आधारित ‘काली’ नाटक सोमवारी ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत पत्रकार कॉलनी नवयुवक क्रीडा प्रसारक बहूद्देशीय संस्था, अकोलाच्या वतीने सादर करण्यात आले.
समाजात आजही स्त्रियांवर अन्याय होत आहे. जी बंड करू न उठते, अशा स्त्रीला समाज अधिकच त्रास देत असतो. नाटकातील स्त्री पात्रालादेखील समाजातील गुंड प्रवृत्तीचा माणूस त्रास देत असतो. तो माणूस त्या स्त्रीला असा विश्वास देतो की, तिच्यावर खूप अन्याय होत आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून ती स्त्रीदेखील अनेक मुलींचे जीव घेते. पुढे ही स्त्री मरण पावते; मात्र ही कुप्रथा थांबत नाही. त्या गुंडप्रवृत्तीच्या माणसाचे शागीर्द परत दुसरी स्त्री वाईट कामे करण्यास तयार करतात. परत कुप्रथेची दुसरी फळी तयार होते, असे ‘काली’ या नाटकातून दाखविण्यात आले. गावावर ‘काली’चा कोप होऊ नये, यासाठी अनेक निष्पाप बळी दिल्या जातात. या कथित कालीचा गावात मोठा दरबार भरविल्या जातो. या कालीवर गावकऱ्यांची श्रध्दा असते. तिच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या असतात. भक्त, त्यांचे प्रश्न, समस्या, मनोकामना काली समोर मांडतात, काली यामधून लोकांना मार्ग दाखवित असते.
नाटकामध्ये कालीची भूमिका राजश्री बोन्ते हिने केली. संध्याचे पात्र अभिलाषा गोळे हिने साकारले. ताईजीची भूमिका शुभांगी पाटील यांनी रंगविली. रघू- उदयकुमार दाभाडे, बबन- अनिमेश देशमुख, छगन- आशिष कांबळे, पागल- श्रृती सोनकुसरे, महिला एक- राधिका भालेराव, बन्सी-अमित आठवले, पोलीस एक- नीलेश गाडगे, हिशेबनीस व शेतकरी भक्त- विशाल गायगोल, माणूस एक- अनुप मानकर, भक्त २ आनंद दांडगे, महिला दोन-उत्तरा पुरकर, मुलगी- गौरी पुरकर, पोलीस दोन- महेंद्र घ्यारे, कार्यकर्ता- अक्षय पिंपळकर, म्हाताºयाची भूमिका गोविंद उमाळे यांनी केली. नाटकाला प्रकाश योजना दीपक नांदगावकर, नेपथ्य गोविंद उमाळे, पार्श्वसंगीत अभिषेक अंबुसकर, वेशभूषा अक्षय पिंपळकर, रंगभूषा महेश इंगळे यांची होती. नाटकाचे लेखन सचिन गिरी यांचे, तर दिग्दर्शन उदयकुमार दाभाडे यांचे लाभले.