प्रगत शाळांमध्ये आश्चर्यकारक वाढ!

By admin | Published: June 7, 2017 01:57 AM2017-06-07T01:57:45+5:302017-06-07T01:57:45+5:30

शिक्षण विभागाचा दावा: वर्षभरातच आठ हजारांवरून २४ हजारांवर शाळा प्रगत!

Amazing increase in advanced schools! | प्रगत शाळांमध्ये आश्चर्यकारक वाढ!

प्रगत शाळांमध्ये आश्चर्यकारक वाढ!

Next

नितीन गव्हाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सन २०१५-१६ मध्ये राज्य शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होत असल्याचा दावा राज्याच्या शिक्षण विभागाने केला असून, प्रगत शाळांच्या संख्येतही आश्चर्यकारक वाढ झाल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या अहवालात दर्शविण्यात आले आहे. २०१५-१६ मध्ये राज्यात केवळ ८ हजार ७९१ शाळा प्रगत झाल्या. २०१६-१७ मध्ये यात आश्चर्यकारक वाढ होऊन तब्बल २४ हजार ६८७ शाळा प्रगत झाल्याचा दावा करण्यात आला.
प्रगत शाळा करण्यासाठी शिक्षण विभागाने वर्षभरामध्ये आठ हजारांवरून २४ हजारांवर घेतलेली उडी आश्चर्यकारक आहे. २०१५-१६ मध्येच शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू करून कामाला सुरुवात केली आणि एकाच वर्षामध्ये आठ हजारांवर शाळा प्रगत केल्या. दुसऱ्याच वर्षी शिक्षण विभागाने वेगाने कामाची गती वाढवत शाळा प्रगत करण्याच्या संख्येत तिप्पट वाढ केली. एकही मूल शैक्षणिकदृष्ट्या मागे राहणार नाही. मुलांमधील मूलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याने अपेक्षित शैक्षणिक प्रगती केली आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधील मूलभूत क्षमता व शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण घेण्यात येते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद यांच्यामार्फत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या वर्षातून तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्यात येतात. यात एक पायाभतू चाचणी व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामधील संकलित मूल्यमापनाच्या दोन चाचण्या घेण्यात येतात, तसेच शासनाकडून शिक्षकांना आवश्यकतेनुसार व मागणीनसार प्रशिक्षणसुद्धा देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी व शाळांची निरंतर प्रगती होत असून, झपाट्याने प्रगत शाळांची संख्या वाढत असल्याचा दावा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या अहवालातून करण्यात आला आहे. शिक्षक तज्ज्ञांच्या मते, प्रगत शाळांमध्ये झालेली वाढ आश्चर्यकारक असून, केवळ आकडा फुगविण्यासाठी तर ही वाढ करण्यात आली नाही ना, असे बोलल्या जात आहे.
पटसंख्येतही मोठी वाढ
एकीकडे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घसरत असताना, दुसरीकडे शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये पटसंख्या वाढत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
२०१४-१५ मध्ये राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ६१.८ लाख एवढी होती. त्यात वाढ होऊन २०१५-१६ मध्ये ६४.२ लाखांवर गेल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने म्हटले आहे.

मुलींची पटसंख्या घसरली
शिक्षण विभागाने शिक्षणातील मुला-मुलींचे प्रवेश वाढविण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी २००९ मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत शाळांमधील मुला-मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. गतवर्षी मुलींची पटसंख्या ४५.७ होती; परंतु किंचित ही टक्केवारी घसरली असून, यंदा मुलींच्या पटसंख्या ४५.५ वर आली आहे.

शाळा प्रगत करण्यावर आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती करण्यावर शासनाने भर दिला असून, शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची कडक अंमलबजावणी सुरू करून चाचण्या आणि शिक्षकांचे प्रशिक्षण याकडे अधिक लक्ष दिले आहे, त्यामुळे वर्षभरामध्ये आश्चर्यकारक बदल घडून आला आहे.
एस. के. कुळकर्णी, शिक्षण उपसंचालक.

Web Title: Amazing increase in advanced schools!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.