अकोल्यातून लढण्यावर आंबेडकर ठाम: सोलापूरच्या निर्णयावर १५ ला भाष्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:25 PM2019-03-13T13:25:30+5:302019-03-13T13:25:46+5:30
‘मी जिथून लढतो ती जागा सोडण्याचा प्रश्नच नाही’, अशा शब्दात त्यांनी अकोल्यात उमेदवारी कायम राहील, हे स्पष्टच केले; मात्र सोलापुरातून लढण्याबाबत १५ मार्चला अंतिम निर्णय घेऊ, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
अकोला: वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी माझी उमेदवारी सोलापुरातून जाहीर केली आहे. मी सोलापुरातून लढावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तो मंगळवारी दूर करीत ‘मी जिथून लढतो ती जागा सोडण्याचा प्रश्नच नाही’, अशा शब्दात त्यांनी अकोल्यात उमेदवारी कायम राहील, हे स्पष्टच केले; मात्र सोलापुरातून लढण्याबाबत १५ मार्चला अंतिम निर्णय घेऊ, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
अकोल्यात त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अॅड. आंबेडकर म्हणाले, की वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मला सहा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याबाबत ‘चॉइस’ देण्यात आला आहे. सोलापुरात तर लक्ष्मण माने यांनी उमेदवारीच जाहीर केली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत; मात्र त्यामुळे अकोला सोडणार नाही. जिथून मी आतापर्यंत लढत आलो, ती जागा सोडण्याचा प्रश्नच नाही किंवा या जागेवर माझ्या कुटुंबातील कोणी उमेदवार राहणार नाही, हेसुद्धा यानिमित्ताने स्पष्ट करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
राखीव मतदारसंघात लढण्यास काय हरकत आहे?
मी कधीही राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविली नाही; मात्र कधीच लढणार नाही, असे नाही. त्या मतदारसंघातूनही लढून पाहता येईल, असे विधान करून अॅड. आंबेडकरांनी सोलापुरातील उमेदवारीबाबत संभ्रम कायमच ठेवला आहे.