जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना आंबेडकरांनी दिल्या कानपिचक्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:15 AM2021-01-09T04:15:42+5:302021-01-09T04:15:42+5:30
अकोला : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी सदस्यांना विश्वासात घेऊन कामे करावी, तसेच पदाधिकारी आणि सदस्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष न ...
अकोला : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी सदस्यांना विश्वासात घेऊन कामे करावी, तसेच पदाधिकारी आणि सदस्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष न करता, त्यांना न्याय दिला पाहिजे, असा सल्ला देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतींच्या शासकीय निवासस्थान परिसरात वंचित बहुजन आघाडीचे परिषद पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्यांची बैठक ॲड.आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेऊनच कामे केली पाहिजेत. यासोबतच पदाधिकारी आणि सदस्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांची कामे प्राधान्याने करून न्याय दिला पाहिजे. चळवळ महत्त्वाची असून, चळवळीत योगदान देणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सत्तेचा जिल्ह्यातील जनसामान्यांच्या विकासासाठी उपयोग करण्याचा सल्लादेखील त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांना दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा जिल्हा परिषद समन्वय समिती सदस्य डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, दिनकरराव खंडारे, जिल्हा परिषद गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, डाॅ. प्रसन्नजित गवई विचारपीठावर उपस्थित होते. या बैठकीला जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, पंचायत समित्यांचे पदाधिकारी व सदस्यांसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नियोजन करून विकासकामे पूर्ण करा
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासकामांसह नावीण्यपूर्ण योजना राबविण्यात येतात. त्यामुळे मतदारसंघनिहाय नियोजन करून विकासकामे पूर्ण करण्याच्या सूचना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांना दिल्या.
मतदारसंघातील समस्या
तत्परतेने सोडवा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन तेथील जनसामान्यांच्या समस्या समजून घेऊन, त्यांच्या समस्या तत्परतेने सोडविण्याचा सल्ला ॲड.आंबेडकर यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह सदस्यांना दिला.
वावड्यांकडे दुर्लक्ष करा;
पुढील सत्ताही ‘वंचित’चीच!
अनेक प्रकारच्या वावड्या उठत असतात; मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून कामे केली पाहिजेत, असे सांगत यापुढेही जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचीच सत्ता राहील, असेही ॲड.आंबेडकर यांनी बैठकीत स्पष्ट केले.
विचारपीठावर पक्ष पदाधिकारी
अन् जि.प. पदाधिकारी खाली
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य तसेच पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांच्या बैठकीत ॲड. आंबेडकर यांच्यासोबत विचारपीठावर केवळ पक्षाचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषद समन्वय समितीचे सदस्य विराजमान होते तर जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह सदस्य विचारपीठाखाली खुर्च्यांवर बसले होते.
................फोटो..........