५२ उमेदवारांच्या यादीला आंबेडकरांचा ‘ग्रीन सिग्नल’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2017 11:39 PM2017-01-23T23:39:15+5:302017-01-23T23:39:15+5:30
अॅड. आंबेडकर यांनी सुचविल्यानुसार पक्षाच्या ५२ उमेदवारांची अद्ययावत यादी निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून पक्षाच्या मुंबई कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
अकोला: महानगरपालिका निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघ निवडणूक निरीक्षक उपसमितीने इच्छुक उमेदवारांची यादी सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे सादर केली असून, उपसमितीने तयार केलेल्या ५२ उमेदवारांच्या यादीला अॅड. आंबेडकर यांनी ह्यग्रीन सिग्नलह्ण दिला आहे.
अकोला महानगरपालिका निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी भारिप-बमसंने सुरू केली आहे. त्यासाठी शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या नावांमधून प्रभागनिहाय उमेदवार भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून निश्चित करण्यात येत आहेत. त्यामध्ये २२ मुस्लीम उमेदवार आणि ३० अनुसूचित जाती व ओबीसी उमेदवार, अशी ५२ उमेदवारांची यादी उपसमितीकडून निश्चित करण्यात आली आहे. पक्षाचे निवडणूक निरीक्षक उपसमितीचे प्रमुख बालमुकुंद भिरड आणि उपसमितीचे सदस्य तथा माजी आमदार हरिदास भदे यांनी सोमवारी दुपारी मुंबई येथे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन, उपसमितीने निश्चित केली उमेदवारांची यादी सादर केली. यादीवर चर्चा केल्यानंतर काही किरकोळ बदल सुचवित, अॅड. आंबेडकर यांनी पक्षाच्या ५२ उमेदवारांच्या यादीला हिरवी झेंडी दाखविली. पक्षाचे इतर १० उमेदवार दोन-तीन दिवसात निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून निश्चित करण्यात येणार आहेत.