आंबेडकरांचे आजारपण अन् पदाधिकाऱ्यांची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:18 AM2021-09-25T04:18:24+5:302021-09-25T04:18:24+5:30
राजेश शेगाेकार : अकाेला राजकारण हे ‘राजकीय प्रयोगां’चंही क्षेत्र आहे. आपल्या महाराष्ट्रात अगदी 'पुलोद'पासून तर सध्याच्या 'महाविकास आघाडी'पर्यंत अचाट ...
राजेश शेगाेकार : अकाेला
राजकारण हे ‘राजकीय प्रयोगां’चंही क्षेत्र आहे. आपल्या महाराष्ट्रात अगदी 'पुलोद'पासून तर सध्याच्या 'महाविकास आघाडी'पर्यंत अचाट राजकीय प्रयोग आपण पाहत आहाेत, अनुभवतही आहाेत. अशा अनेक प्रयाेगांनीच राजकारण हे प्रवाही व नित्य नवे राहत आहे. सध्याच्या राजकारणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वाधिक राजकीय प्रयाेग केेले आहेत. सध्या ते आजारी आहेत. त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली आहे, मात्र या आजारपणात विश्रांती घेतानाही त्यांनी संघटनेची ताकद अजमावण्याचा प्रयाेग सुरू केला आहे. शस्त्रक्रिया हाेण्याआधीच त्यांनी समाज माध्यामांवर जे निवेदन प्रसिद्ध केले आहे त्यामधून पदाधिकाऱ्यांनाच परीक्षेला बसविले आहे.
सध्या जिल्हा परिषदेचे राजकारण तापले आहे, अकाेल्यात शिवसेना-राष्ट्रवादीने वंचितच्या विराेधात एकत्रितरीत्या दंड थाेपटले आहेत, तर काँग्रेस आणि भाजपा स्वबळावरच वंचितची सत्ता खाली खेचण्याची रणनीती आखत आहेत. अकाेला जिल्हा परिषदेच्या आखाड्यात आतापर्यंत वंचितचेच पहेलवान जिंकत आहेत. आता हाेत असलेल्या १४ पैकी ८ जागांवर वंचितचा विजय झाला हाेता. त्यामुळे या जागा कायम ठेवत त्यामध्ये भर टाकून काठावरची सत्ता एकहाती कायम ठेवण्याचे वंचित समाेर आव्हान आहे. वाशिममध्ये गेल्यावेळी ५२ पैकी ८ जागा जिंकून वंचितने आपली ताकद दाखविली हाेती आता तेथे अनंतराव देशमुख यांच्यासारख्या जाणत्या नेतृत्वासाेबत वंचित रिंगणात आहे. अनंतरावांच्या गटाचे सात सदस्य विजयी झाले हाेेते. त्यामुळे १४ जागांमध्ये या दाेघांची ताकद वाढली तर वाशिम जिल्हा परिषदेच्या सत्तेची गणिते बदलू शकतात. या पृष्ठभूमीवर ॲड. आंबेडकर हे आजारपणामुळे निवडणुकीच्या रिंगणात नसतील, इतकेच नाही तर त्यांनी चक्क पक्षाच्या कार्यातूनच रजा घेतल्याने ते प्रचारालाही नसतील हे स्पष्टच आहे.
एकीकडे जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा घेऊन विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह ठेवल्यामुळे विराेधकांसाठी प्रचाराकरिता हा मुद्दा आयताच मिळाला आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसमाेर पक्षाला एकसंघ ठेवत वंचितचा झेंडा उंचावण्याचे आव्हान आहे. बरेचदा माेठ्या नेत्यांच्या सहवासात राहून लहान कार्यकर्त्यांनाही आपणच नेते असल्याचे भास हाेतात, मात्र नेतृत्वाने पाठ फिरवली की अशा भासमानी कार्यकर्त्यांची सावली किती लहान आहे हे स्पष्ट हाेते. मग त्यांची अस्तित्व टिकविण्यासाठी हाेणारी धडपड आपण सारेच पाहताे. आंबेडकरांच्या राजकीय कारर्किदीतही अशा अनेक भासमानी कार्यकर्त्यांनी आपणच नेते असल्याचा आभास निर्माण केला हाेता त्यातून त्यांच्या महत्त्वाकांक्षांना खतपाणी मिळाले व त्यांनी इतर पक्ष जवळ केला. त्यानंतर अशा नेतृत्वाचे काय झाले हे जगजाहीर आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत कस लागणार आहे ताे पहिल्या फळीतील नेतृत्वाचा. पक्षाची जबाबदारी ज्यांना दिली आहे त्यांनी पदाला किती न्याय दिला याचेही मूल्यमापन या निमित्ताने हाेणारच आहे. केवळ उपचार कालावधीसाठी प्रभारी अध्यक्ष नेमणाऱ्या ॲड. आंबेडकरांकडे पदाधिकाऱ्यांच्या अशा मूल्यमापनाची ब्ल्यू प्रिंटही तयारच असेल. त्यामुळे ही जिल्हा परिषद निवडणूक वंचितसाठी दुहेरी प्रतिष्ठेची ठरत आहे यात शंका नाही.