राष्ट्रीय राजकारणात वाढले आंबेडकरांचे महत्त्व!
By admin | Published: June 25, 2017 08:09 AM2017-06-25T08:09:09+5:302017-06-25T08:09:09+5:30
राष्ट्रपतीपदासाठी पहिल्यांदाच अकोलेकराच्या नावाची चर्चा
राजेश शेगोकार / अकोला
राष्ट्रपतीपदासाठी भाजपाने रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी तोडीसतोड उमेदवाराचा शोध सुरू केला. या संभाव्य उमेदवारांमध्ये अँड. प्रकाश आंबेडकर यांचेही नाव डाव्या पक्षांनी पुढे केल्याने, राष्ट्रपतीपदासाठी प्रथमच अकोलेकर राजकीय नेत्याच्या नावाची चर्चा झाली. ही बाब अकोलकरांसाठी अभिमानाची ठरली. दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी उमेदवारच देण्यात यावा, या भूमिकेवर अँड. आंबेडकर ठाम राहिल्यामुळे मीरा कुमार यांचे नाव अंतिम झाले; मात्र या घटनाक्रमामुळे अँड. आंबेडकरांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व वाढल्याचे समोर आले आहे.
अँड. प्रकाश आंबेडकर हे नाव देशाच्या राजकारणात नवीन नाही. नेहमीच प्रवाहाच्या विरोधात जाण्याचे अन् स्वतंत्र राजकारण करण्याची त्यांची शैली असल्यामुळे त्यांनी बहुतांश सत्ता या स्वबळावरच मिळविल्या आहेत. केवळ दलितांचे राजकारण न करता मुस्लीम, बहुजनांची मोट बांधत त्यांनी देशात सर्वप्रथम ह्यसोशल इंजिनिअरिंगह्णचा प्रयोग राबविला. अकोला पॅटर्न या नावाने भारिप-बहुजन महासंघाने पश्चिम वर्हाडासह मराठवाड्याच्या राजकारणात नवा पर्याय उपलब्ध करून दिला. अकोल्यात तर बाबासाहेबांचे नातू म्हणून त्यांना मिळालेले प्रेम आतापर्यंत कुठल्याही नेत्याला मिळाले नाही. १९८0 च्या दशकानंतर अँड. आंबेडकरांनी अकोला हीच कर्मभूमी ठरवित राजकारण केले व येथून राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक नेत्यांशी सतत संपर्क व समविचारी आंदोलनात भाग घेऊन आपली सक्रियता कायम ठेवली आहे.
अँड. आंबेडकरांनी राजकारणातील भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट ठेवली आहे. महाराष्ट्रात निघालेल्या विविध जातींच्या मोर्चांना त्यांनी सर्मथन दिले नाहीच; मात्र प्रतिमोर्चे काढू नका, असे आवाहन करून जातीय द्वेषाची बीजे अधिक रोवल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेतली. भारिप-बहुजन महासंघाची ह्यव्होटह्ण बँक असलेल्या ओबीसींना बाळासाहेबांच्या या भूमिकेमुळे आश्वस्त वाटणे साहजिकच आहे. त्यांच्या अशा सक्रिय भूमिकांमुळेच त्यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी समोर आले होते, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात आहे.
२0१९ ची लोकसभा निवडणूक डोळय़ांसमोर ठेवत आता अँड. आंबेडकर ओबीसींच्या परिषदा घेऊन निवडणुकांची पेरणी करीत आहेत. सोबतच राष्ट्रीय राजकारणात डाव्यांसोबत नवी गणिते मांडता येतील का, याचीही चाचपणी करीत असल्याने राष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नाव येण्यामागे दिल्लीतील डाव्यांसोबत असलेली जवळीक, हेही एक कारण आहेच. यापूर्वीही त्यांनी माकपचे तत्कालीन महासचिव कॉ. प्रकाश कारत यांच्यासमवेत शेगावात कापूस परिषद घेऊन राष्ट्रीय राजकारणात डाव्यांची सोबत केली आहेच, त्यामुळे येणार्या निवडणुकीसाठी ते पुन्हा एकदा समविचारी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत असल्याने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे. अँड. आंबेडकरांनी आदिवासी उमेदवाराबाबत आपला आग्रह सोडला असता, तर कदाचित त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले असते. अशावेळी अनेक वर्षांपासून त्यांचा काँग्रेससोबत तुटलेला संबंध पुन्हा जुळला असता, त्यामुळे अकोल्याच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही मोठी उलथापालथ शक्य झाली असती. तसेही सध्या अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या बैठकीत अँड. आंबेडकरांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीमध्ये अँड. आंबेडकरांचे नाव येणे, हे भारिप-बमसं तसेच राष्ट्रीय राजकारणात अँड. आंबेडकरांचे महत्त्व वाढविणारे ठरले आहे.