वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:54+5:302021-04-10T04:18:54+5:30
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची १०२ रुग्णवाहिका गत तीन महिन्यांपासून बंद होती. रुग्णवाहिका ...
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची १०२ रुग्णवाहिका गत तीन महिन्यांपासून बंद होती. रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने परिसरातील गरोदर माता व रुग्णांना नाहक त्रास सोसावा लागत होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दुसऱ्याच शुक्रवारी जि. प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी पाठपुरावा करून १०२ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केली.
वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्र असून, आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. परिसरातील गावातील गरोदर मातांना १०२ रुग्णवाहिका उपचारासाठी नेण्याचे काम करते. गरोदर मातांना पुढील उपचार करायचा झाल्यास त्या रुग्णांना १०२ या रुग्णवाहिकेने अकोला येथे पुढील उपचारासाठी नेण्यात येते. गत तीन महिन्यांपासून येथील १०२ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने काही गरोदर मातांना खासगी वाहन सांगून पुढील उपचारासाठी नेले जात होते. या वाहनाचा आर्थिक भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत होता. याबाबत ७ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच याची आरोग्य विभागाने दखल घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रात गाडी उपलब्ध झाल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी मसने यांनी सांगितले. (फोटो)