लिपिकापेक्षा रुग्णवाहिका चालकाला अधिक वेतन; वाडेगावातील महात्मा फुले पतसंस्थेतील गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:01 PM2018-02-28T14:01:06+5:302018-02-28T14:01:06+5:30
अकोला : वाडेगावातील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या पैशांवर संचालक मंडळ, व्यवस्थापकांनी मिळून चांगलीच मौज सुरू केल्याचे किस्से तालुका उपनिबंधकांच्या अहवालातून पुढे आली आहेत.
अकोला : वाडेगावातील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या पैशांवर संचालक मंडळ, व्यवस्थापकांनी मिळून चांगलीच मौज सुरू केल्याचे किस्से तालुका उपनिबंधकांच्या अहवालातून पुढे आली आहेत. त्यामध्ये कळस म्हणजे, संस्थेच्या लिपिकापेक्षाही गरज नसलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाला अधिक वेतन दिल्या जात असल्याचा विरोधाभासही पुढे आला आहे.
पतसंस्थेत ठेवीदारांच्या ठेवी स्वीकारून त्याचे कर्जरूपात वाटप करताना संचालक मंडळ, व्यवस्थापकाने प्रचंड मनमानी केली आहे. एखाद्याला कर्ज देण्यासाठीच्या प्रस्तावावर ठराव घेऊन मंजुरी देण्याच्या प्रक्रियेतच अस्पष्टता आहे. त्यासाठी संचालक मंडळाच्या ठरावामध्ये कर्ज मागणीदाराचे नाव नसणे, त्यांनी मागणी केलेली रक्कम, त्याला मंजूर केलेली रक्कम या बाबी स्पष्टपणे नमूद न करता मोघम स्वरूपाचे ठराव मालतारण कर्ज दिल्यानंतर मंजूर केल्याचेही चौकशीत पुढे आले आहे. सभेमध्ये कर्जदार वा त्यांनी मागणी केलेली रक्कम या बाबीची शहानिशा न करता मान्यता देण्यात आली. त्यामुळे पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहाराला संचालक मंडळही तेवढेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
सेवा नियम लागू नसतानाही केले पदावनत
१०३ पोते धान्याची चोरी, त्यानंतर ५० लाखांपेक्षाही अधिक रकमेचे बोगस कर्जवाटप प्रकरणी संचालक मंडळाने व्यवस्थापकाला पदावनत केले. त्या व्यवस्थापकाला कोणतीही सेवा नियम लागू नसताना ही कारवाई केली. त्याचवेळी पदावनतीनंतरच्या पदाऐवजी आधीच्या पदाचेच वेतन देण्यात आले. त्यामुळे संचालकांकडून केवळ कारवाईचा आभास निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात गोदामपाल, व्यवस्थापकाला वाचवले जात आहे, असेही चौकशी अहवालात म्हटले आहे.
बिनकामाच्या रुग्णवाहिकेवर चालकाची नियुक्ती
संस्थेची रुग्णवाहिका आहे. तिचा दैनंदिन कुठेही उपयोग होत नसल्याच्या नोंदी आहेत. त्या रुग्णवाहिकेवर असलेले चालक गजानन सुखदेव नावकार यांना वेतन दिले जाते. त्यांचे वेतन संस्थेतील लिपिक डिगांबर सुखदेव मसने यांच्या वेतनापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे उपलब्ध माहितीवरून स्पष्ट करण्यात आले. या प्रकारातूनही ठेवीदारांच्या पैशांची लूट सुरू असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकेला नियमित चालकाची आवश्यकता नसल्याचेही अहवालात नमूद केले आहे.