अमीत सावल मृत्यूप्रकरणात चौघांचे जबाब नोंदविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 06:17 PM2019-09-29T18:17:55+5:302019-09-29T18:18:13+5:30
पोलिसांनी या प्रकरणातील चार जनांचे बयाण नोंदविल्याची माहिती आहे.
अकोला: शहरातील प्रसिद्ध दत्त मेडीकलचे संचालक जयप्रकाश सावल यांचा मुलगा अमित सावल यांचा मृतदेह महान धरणात गुरुवारी आढळल्यानंतर अमितच्या कुटुंबीयांनी घातपाताची शंका पोलिसांकडे व्यक्त करताच पोलिसांनी या प्रकरणातील चार जनांचे बयाण नोंदविल्याची माहिती आहे. अमीतच्या वडीलांच्या आरोपनंतर या प्रकरणातील संशयीतांची कसून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
जयप्रकाश सावल यांचा मुलगा अमित सोमवार २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरून महानकडे निघून गेला होता. यावेळी त्याच्या बहिणीने अचानक त्याला फोन केला असता तो महान येथे असल्याची माहिती दिली. रात्री ८ वाजताच्या सुमारास अमितने महान धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यानंतर महान येथील धरणात गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अमितचा मृतदेह आढळल्यानंतर त्याचा घातपात झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी सखोल चौकशीची मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील चार जनांची चौकशी सुरु केली असून त्यांचे बयाण नोंदविले आहे. अमितच्या भुवया आणि ओठावर काही प्रमाणात जखमा असल्याने तसेच तो एका साखळीच्या जाळयात अडकल्यामुळे खंडणीसाठी त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास एक मोठे रॅकेटच उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पिंजर आणि खदान पोलिस सद्या संयुक्तरीत्या तपास करीत आहेत. मात्र अमीतच्या वडीलांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
मोठे रॅकेट येणार उघडकीस
अमीत सावल याला एका जाळयात ओढून त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसुल केल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे अमीतला जाळयात ओढणाºया तरूणी आणि तरुणांची एक टोळीच असून त्यांच्याकडून या मृत्यू प्रकरणातील मुख्य धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. यामध्ये एका वकीलाचाही समावेश असून पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास श्रीमंतांच्या मुलांना गंडविणारी मोठी टोळीच उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवीली आहे.