अखेर अमित सावल यांचा मृतदेहच आढळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:35 PM2019-09-27T13:35:23+5:302019-09-27T13:35:58+5:30
शहरातील प्रसिद्ध मेडिकल व्यावसायिक जयप्रकाश सावल यांचा मुलगा अमित सावल यांचा अखेर मृतदेहच आढळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गत तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला शहरातील प्रसिद्ध मेडिकल व्यावसायिक जयप्रकाश सावल यांचा मुलगा अमित सावल यांचा अखेर मृतदेहच आढळला असून, अमितच्या कुटुंबीयांनी घातपाताची किनार असल्याचा आरोप केला आहे. याबाबत खदान व पिंजर पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणात आता तपासाची चक्रे गतीने फिरणार असून, घातपाताच्या दिशेनेच तपास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जयप्रकाश सावल यांचा मुलगा अमित सोमवारी सायंकाळी घरून महानकडे निघून गेला होता. यावेळी त्याच्या बहिणीने अचानक त्याला फोन केला असता तो महान येथे असल्याची माहिती दिली. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अमितने महान धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे; मात्र महान येथील धरणात गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अमितचा मृतदेह आढळल्यानंतर त्याचा घातपात झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी सखोल चौकशीची मागणी पोलिसांकडे केली आहे. संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने तीन दिवस अथक परिश्रम केल्यानंतर त्यांना पाणी सोडण्यासाठी असलेल्या गेट क्रमांक तीनजवळ हा मृतदेह दिसताच त्यांनी परिश्रम घेत अमितचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. अमितच्या भुवया आणि ओठावर काही प्रमाणात जखमेसारखा भाग दिसल्याची माहिती आहे.
त्यानंतर पिंजर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून अमितचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पिंजर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पिंजर व खदान पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करणार असल्याची माहिती आहे.
अमित मोठ्या टोळीचा बळी
मॉडेलिंग क्षेत्रातील काही तरुणींना समोर करून श्रीमंतांच्या मुलांना जाळ्यात ओढणे, त्यानंतर त्यांच्याकडील रोकड उकळणे यासह अनेक प्रकारे त्यांची ब्लॅकमेलिंग करण्यासाठी एक मोठी टोळीच कार्यरत असल्याची माहिती आहे. या टोळीच्याच जाळ्यात अमितला अडकविण्यात आल्याची माहिती असून, त्या दिशेने तपास करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
गाडगेबाबा पथकाचे तीन दिवस परिश्रम
पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासह त्यांच्या पथकाने महान धरणात अमितच्या शोधासाठी सोमवारी रात्री ‘सर्च आॅपरेशन’ सुरू केले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी अमितचा मृतदेह आढळेपर्यंत या पथकाचे आॅपरेशन अविरत सुरू होते. त्यांचे कार्य हे समाजासाठी मोठे प्रेरणादायी असल्याचे यावेळी दिसून आले.