अमित शाह यांचे अकोला शहरात जल्लोषात स्वागत! स्वागत कमानी, फलक अन् रांगोळ्यांनी वेधले लक्ष
By संतोष येलकर | Published: March 5, 2024 07:06 PM2024-03-05T19:06:08+5:302024-03-05T19:06:27+5:30
Amit Shah In Akola: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवार, ५ मार्च रोजी अकोला दौऱ्यावर आले होते. शिवणी विमानतळापासून राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा जवळच्या हाॅटेल जलसापर्यंत शहरातील रस्त्यावर भाजपच्यावतीने शाह यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
- संतोष येलकर
अकोला - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवार, ५ मार्च रोजी अकोला दौऱ्यावर आले होते. शिवणी विमानतळापासून राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा जवळच्या हाॅटेल जलसापर्यंत शहरातील रस्त्यावर भाजपच्यावतीने शाह यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख चौकांसह रस्त्यांवर पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यासोबतच त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या स्वागत कमानी, फलक आणि आकर्षक रांगोळ्यांनी अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले.
पश्चिम विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक अकोल्यातील रिधोराजवळील हाॅटेल जलसा येथे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी घेतली. त्यानुषंगाने अकोल्याच्या शिवणी विमानतळावर शाह यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल,आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, अर्चना मसने,भूषण कोकाटे आदींनी शाह यांचे स्वागत केले. त्यानंतर शिवणी चौक, महाकाली चौक, अशोक वाटीकाजवळील चौक, वाशिम रोड चौक आदी प्रमुख चौकांमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने शाह यांचे स्वागत करण्यात आले.
प्रमुख चौकांमध्ये पुष्पवृष्टी !
शहरातील अशोक वाटीका चौक, लक्झरी बस स्टॅन्ड चौक, वाशिम रोड चौक आदी प्रमुख चौकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने पुष्पवृष्टी करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देवून शाह यांनी केले अभिवादन !
बैठकीच्या ठिकाणी प्रस्थान करताना राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी येथील चौकात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देवून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षि शाहू महाराज, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन वंदन केले.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ.रणधीर सावरकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे, माजी नगरसेवक विशाल इंगळे, भन्ते परितानंद, माजी नगरसेविका दिपाली जगताप, प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.