अमोल मिटकरी कार तोडफोड प्रकरण; मनसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना जामीन मंजूर!

By नितिन गव्हाळे | Published: August 1, 2024 12:37 AM2024-08-01T00:37:24+5:302024-08-01T00:37:42+5:30

आमदार मिटकरी यांच्यावर हल्ला प्रकरण, १३ जणांवर गुन्हे दाखल, इतर फरार.

Amol Mitkari car vandalism case; Bail granted to three including MNS district president! | अमोल मिटकरी कार तोडफोड प्रकरण; मनसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना जामीन मंजूर!

अमोल मिटकरी कार तोडफोड प्रकरण; मनसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना जामीन मंजूर!

नितीन गव्हाळे, अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीका केल्याने अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मनसे जिल्हाध्यक्षांसह १३ जणांना हल्ला करण्याचा प्रयत्न करीत, त्यांच्या कारची तोडफोड केली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हे दाखल केल्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षासह एकास अटक केली. सत्र न्यायालयाने बुधवारी तिघांना जामिन मंजूर केला.

मंगळवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे मनसेची पक्षाचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी हे विश्रामगृहावर आले असल्याची माहिती मिळाल्यावर मनसैनिकांनी ते थांबलेल्या कक्षात मोर्चा वळविला आणि शिवीगाळ आणि एकेरी भाषा वापरत, त्यांनी मिटकरी बसलेल्या कक्षाचा दरवाजा ठोठावला. परंतु तेथील कार्यकर्त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना आत शिरू दिले नाही. त्यामुळे नारेबाजी करीत, मनसैनिकांनी बाहेर उभ्या असलेल्या आमदार मिटकरी यांच्या कारवर दगडफेक करीत, कारच्या काचा फोडल्या. या प्रकरणात आमदार अमोल मिटकरी यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत, दीपक बोडखे, कर्णबाळा दुनबळे, अरविंद शुक्ला, ललित यावलकर, मंगेश देशमुख, जय मालोकार, रूपेश तायडे, योगेश वाघमारे, मनसे महिला आघाडी प्रमुख प्रशंशा अंबेरे, सचिन गालट, मुकेश धोंडफळे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यापैकी साबळे, भगत व बोडखे यांना पोलिसांनी बुधवारी अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांनाही जामिन मंजूर केला. उर्वरित मनसैनिक फरार आहेत.
 
जय मालोकार यांच्यावर गावी अंत्यसंस्कार
मंगळवारी दुपारी झालेल्या हल्ला प्रकरणात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकार(२७) हेसुद्धा सहभागी झाले होते. मंगळवारीच दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास, त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने, खाजगी रूग्णालयात भरती केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात निंबी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
अमित ठाकरे घेणार जयच्या कुटूंबियांची भेट
मंगळवारी झालेल्या तोडफोड प्रकरणानंतर विद्यार्थी सेनेचा जय मालोकार यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी त्यांचा नाशिक येथील दौरा रद्द केला आहे. अमित ठाकरे हे गुरूवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कारने अकोल्यात येणार आहेत. अकोल्यातून ते निंबी येथे जाऊन जय मालोकार यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन, त्यांचे सांत्वन करणार आहेत.

Web Title: Amol Mitkari car vandalism case; Bail granted to three including MNS district president!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.