शहरातील दोन बुकींकडून ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
By admin | Published: April 24, 2017 01:45 AM2017-04-24T01:45:48+5:302017-04-24T01:45:48+5:30
शहरात ‘आयपीएल’ सामन्यांवर कोट्ट्यवधींचा सट्टा
अकोला : आयपीएलच्या दहाव्या सत्रात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यामध्ये शनिवारी रात्री खेळल्या जात असलेल्या सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा खेळणाऱ्या येथील दोन बुकींना अटक करून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी ही कारवाई केली.
दरम्यान, आयपीएलचा रंग आता चढत असतानाच अकोला शहरातील बुकी सक्रिय झाले असून, त्यांनी कोट्ट्यवधी रुपयांचा सट्टा खेळणे सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जुने शहरातील भगतवाडी परिसरात दोन बुकींकडून मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती मिळाली. यावरून पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री भागवतवाडी येथील दोन बुकींच्या घरी छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये तब्बल तीन लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, क्रिकेट सट्टा घेणारे बुकी प्रतीक कोठारी आणि अभिषेक मोयाल या दोघांना अटक करण्यात आली. या दोन बुकींकडून एक लाख ९४ हजार रुपये रोख आणि अडीच लाख रुपयांचे दहा मोबाइल, एक टीव्ही, डिश टीव्ही, लॅपटॉपसह साडेतीन लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या बुकींना शनिवारी रात्रीपासून तर रविवारी दुपारपर्यंत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही बुकींचा जामीन झाल्यावर त्यांची रविवारी सायंकाळी सुटका करण्यात आली.
शहरातच बुकींचा ठिय्या
आयपीएल सुरू होताच सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळण्यात येतो. यामध्ये बुकींच्या विविध टोळ्या सक्रिय झाल्या असून, त्यांचे ठिय्ये शहरातच विविध भागात थाटण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आलिशान कारमध्ये, शहरातील काही पॉश निवासस्थान आणि फ्लॅटमध्ये बुकींनी त्यांचे अड्डे बनविले आहेत. या ठिकाणांवरूनच क्रिकेट सामन्यांवर कोट्ट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात येत आहे.
श्रेय लाटण्याची स्पर्धा
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची बदली होणार असल्याची चर्चा असल्याने काही पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बुकींना खुली सूट दिली असल्याचीही चर्चा आहे. बुकींवर शनिवारी रात्री पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी कारवाई केली; मात्र या कारवाईचे श्रेय स्थानिक गुन्हे शाखेने लाटण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस वर्तुळातील सूत्रांचे म्हणणे आहे.