वन्यप्राण्यांचा शेतातील उपद्रव रोखण्यासाठी कुरणाची मात्रा
By Atul.jaiswal | Published: April 1, 2023 01:33 PM2023-04-01T13:33:29+5:302023-04-01T13:33:59+5:30
१७५ हेक्टरवर गवताची लागवड : वन विभागाचा उपक्रम
अकोला : शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या पिकावर वन्य प्राणी डल्ला मारतात. एवढेच नाही तर रानडुकरांसारखे प्राणी नासाडीही करतात. अन्नाच्या शोधात वन्यप्राणी शेतांकडे वळतात ते अन्न म्हणजेच 'गवत' त्यांना वन हद्दीतच उपलब्ध व्हावे,यासाठी वन विभागाने कुरण विकास कार्यक्रम राबविला आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ९० हेक्टर तर दुसऱ्या टप्प्यात ८५ हेक्टर अशा एकूण १७५ हेक्टर वनक्षेत्रावर वन्य प्राण्यांचे खाद्य असणारे गवत लागवड करुन त्याचे संवर्धन करण्यात येत आहे.
कुरण विकासात वन विभागाच्या हद्दीतील मोकळ्या जमिनींची नांगरणी करुन त्यावर सरी पद्धतीने गवत बी पेरले जाते. साधारण एक मिटर अंतरावर ह्या सरी पाडल्या जातात. काही वेळा गवताचे रोप तयार करुनही लागवड केली जाते. गवत मोठे झाल्यावर त्याचे बी पुन्हा जमिनीत पडते. पुढल्या पावसात हेच बी पुन्हा अंकुरते आणि गवताची घनता वाढते. साहजिकच हे गवत वन्य प्राण्यांचा अन्नाचा शोध सुरु होतो तेव्हा त्यांना खाता येते. या जादाच्या वेळात तिकडे शेतांमधील पिके शेतकऱ्यांच्या हाती आलेली असतात आणि नुकसान टळलेले असते.
कुठे केली कुरणांची निर्मिती
पहिल्या टप्प्यात सन २०२२-२३ मध्ये बोरगाव (२० हेक्टर), बाभुळगाव (२५ हेक्टर), सोनखास (३० हेक्टर) या प्रमाणे व याशिवाय बाभुळगाव मध्येच अतिरिक्त १५ हेक्टर क्षेत्रात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतूनही कुरण विकास करण्यात आले असून एकूण ९० हेक्टर क्षेत्रावर कुरणांचा विकास करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात पातुर (२० हेक्टर), सोनखास (३० हेक्टर), परांडा (३५ हेक्टर) अशी ८५ हेक्टरवर कुरण विकास कार्यक्रम राबविला जात आहे.