तीन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली अनुदानाची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 10:45 AM2021-05-05T10:45:13+5:302021-05-05T10:45:42+5:30
Akola News : यासंदर्भात मंगळवारी जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत विचारणा करण्यात आली.
अकोला: जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांपैकी जवळपास तीन हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम अद्याप जमा झाली नाही. यासंदर्भात मंगळवारी जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत विचारणा करण्यात आली.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सुरु आहे. परंतु अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम अद्यापही जमा झाली नाही. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी सभापती पंजाबराव वडाळ, सदस्य अर्चना राऊत, संजय अढाऊ यांनी जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांना सभेत विचारणा केली. वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक कारणामुळे काही लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा न होता कृषी विभागाकडे परत आली. ज्या शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम परत आली, अशा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दहा दिवसात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले. कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या सभेत कृषी समितीचे सदस्य संजय अढाऊ, अनंत अवचार, अर्चना राऊत, गीता मोरे, रायसिंग राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.