सोयाबीन लागवडीत अमरावती विभागाची पिछाडी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:21 AM2021-08-15T04:21:33+5:302021-08-15T04:21:33+5:30
देशात सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेशचा पहिला, महाराष्ट्राचा दुसरा, तर राजस्थानचा तिसरा क्रमांक आहे. सोयाबीन, कपाशी ही राज्याची मुख्य पीक ...
देशात सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेशचा पहिला, महाराष्ट्राचा दुसरा, तर राजस्थानचा तिसरा क्रमांक आहे. सोयाबीन, कपाशी ही राज्याची मुख्य पीक ओळखली जातात. ४२ लाख हेक्टरवर कापूस, तर तितक्याच प्रमाणात सोयाबीनची लागवड राज्यात होते. या वर्षी मात्र दरातील तेजीच्या परिणामी शेतकऱ्यांची सोयाबीनला पसंती राहिली आहे. त्यामुळेच राज्यात या पिकाखालील क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली. यंदाच्या हंगामात अमरावती विभागात १५ लाख ०३ हजार २६३ हेक्टरवर तसेच लातूर विभागात १३ लाख ३४ हजार ३०६ हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. निसर्गाची साथ लाभल्याने पेरण्याही उत्तमरीत्या पार पडल्या; परंतु अमरावती विभागात १४ लाख १९ हजार ०७३ हेक्टरवर पेरणी झाली. तर लातूर विभागात क्षेत्र वाढून १७ लाख २७ हजार ७९९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्यामुळे यंदा सोयाबीन लागवडीत अमरावती विभागाची पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे.
लातूर, नांदेड जिल्ह्यात पेरणीत अव्वल !
राज्यात लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी झाली. त्यापाठोपाठ नांदेड, उस्मानाबाद व बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी झाली आहे. अकोला, यवतमाळ जिल्ह्यातही पेरणी क्षेत्रात काहीअंशी वाढ झाली असल्याचे कृषी विभागातील अहवालातून समोर आले.