बायोमेट्रिक उपस्थिती पद्धतीतून अमरावती, लातूर विभाग वगळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:48 PM2018-07-17T14:48:11+5:302018-07-17T14:51:38+5:30
शिक्षण विभागाने अमरावती व लातूर विभागात विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती लागू केली नसल्याचा आरोप कनिष्ठ महाविद्यालय संचालकांनी केला आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: राज्य शासनाने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी तासिका हजेरी लावावी, या उद्देशाने मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या विभागात कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु यातून शासनाने अमरावती आणि लातूर विभाग वगळल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वाधिक कोचिंग क्लासेस अमरावती आणि लातूर विभागात आहेत. त्यांच्या दबावातूनच शिक्षण विभागाने अमरावती व लातूर विभागात विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती लागू केली नसल्याचा आरोप कनिष्ठ महाविद्यालय संचालकांनी केला आहे.
विज्ञान शाखेचे विद्यार्थी केवळ नावाला इयत्ता अकरावीत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. या ठिकाणी उपस्थिती बंधनकारक नसल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिकेला हजेरी न लावता, केवळ कोचिंग क्लासेसच्या शिक्षणावर भर देतात. त्यामुळे राज्यात सर्वत्रच कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थी संख्येअभावी ओस पडली आहेत. एवढेच नाही तर अनेक कोचिंग क्लासेस संचालकांनी स्वत:चे स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालये सुरू केली. त्यामुळे आपल्या क्लासमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला स्वत:च्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास बाध्य केले जाते. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी तर खासगी कोचिंग क्लासेस वर्गांसोबत सामंजस्य करार केल्याचेसुद्धा शासनानेच म्हटले आहे. विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिका नियमित हजर राहत नसल्यामुळे शासनाने अमरावती व लातूर विभाग वगळून राज्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत शिकणाºया विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरू केली. शासनाने कोचिंग क्लासेसचा दाखला देत, हा निर्णय घेतला खरा; परंतु ज्या अमरावती व लातूर विभागात सर्वाधिक कोचिंग क्लासेस आहेत, त्याच विभागाला बायोमेट्रिक उपस्थितीतून शासनाने कसे काय वगळले, याचेच कनिष्ठ महाविद्यालय संचालकांना आश्चर्य वाटत आहे. शासनाने स्वत:च्याच निर्णयाला हरताळ फासला आहे. शासनाने हे दोन्ही विभाग जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप शिक्षक संघटना, कनिष्ठ महाविद्यालय संचालकांनी केला आहे.
अमरावती विभागात बायोमेट्रिक पद्धत हवीच!
बायोमेट्रिक पद्धतीतून वगळलेल्या अमरावती विभागात सर्वाधिक कोचिंग क्लासेस अकोला, अमरावती शहरांमध्ये आहेत. लातूर विभागातसुद्धा लातूर, परभणी, नांदेड शहरामध्ये सर्वाधिक कोचिंग क्लासेस आहे. त्यामुळे या भागासाठी बायोमेट्रिक पद्धत अत्यंत गरजेची होती. येथील कोचिंग क्लासेसमुळे कनिष्ठ महाविद्यालये केवळ प्रवेशापुरती उरली आहेत. विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिकांना कमी अन् क्लासेसमध्ये अधिक उपस्थित असतात. त्यामुळे अमरावती विभागात बायोमेट्रिक पद्धत हवीच.
शासनाने सर्वच विभागात विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक पद्धती लागू केली; परंतु यातून अमरावती व लातूर विभाग वगळून शासनाला काय साध्य करायचे आहे? महत्त्वाचे सर्वाधिक शिकवणी वर्ग याच भागात आहेत. महाविद्यालयांमध्ये तासिका नियमित झाल्या तर गरीब विद्यार्थ्यांना फायदा होईल. गरीब विद्यार्थी शिकवणी वर्गाची महागडी फीस भरू शकत नाहीत.
प्रा. विवेक डवरे, अध्यक्ष, आदर्श महाविद्यालय.