तांत्रिक अडचणींमुळे अमरावती विद्यापीठाची परीक्षा पुन्हा रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 02:38 PM2020-10-12T14:38:55+5:302020-10-12T14:39:06+5:30
परीक्षासाठी विद्यापीठाने दिलेल्या प्रवेशपत्रात मोठ्या प्रमाणात चुका होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत अंतिम वर्षाच्या परीक्षा १२ आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या; परंतु तांत्रिक अडचणींमुळे या परीक्षा पुन्हा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रद्द झालेल्या परीक्षासाठी विद्यापीठाने दिलेल्या प्रवेशपत्रात मोठ्या प्रमाणात चुका होत्या. एमए (राज्यशास्त्र) भाग २ च्या चार विषयांऐवजी प्रवेश पत्रावरच तीनच विषय दिले होते.
कोरोनामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सर्वच परीक्षा रेंगाळल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर या परीक्षा १ आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या; मात्र राज्यात अकृषी विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नव्या वेळापत्रकानुसार या परीक्षा १२ आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या. कोरोनाचा संभाव्य धोका पाहता या परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येणार होत्या; परंतु तांत्रिक अडचणींमुळे सोमवारपासून सुरू होणाºया परीक्षा पुन्हा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या सुधारित तारखांची घोषणा येत्या दोन दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
ज्या पद्धतीने महाविद्यालय स्तरावर प्रात्यक्षिक परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेतल्या आहे त्याच पद्धतीने पेपरलेस आॅनलाईन परीक्षा घेण्याची जबाबदारी आता विद्यापीठाने महाविद्यालयावर टाकावी. विद्या परिषद सभेत मी ठेवलेला प्रस्ताव सुद्धा खूप चांगला होता तो प्रस्ताव दुर्लक्षित झाला नसता तर आता पर्यंत निकालही घोषित झाले असते.
- डॉ. आर. डि. सीकची,
अध्यक्ष सं.गा.बा. अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रिय प्राचार्य फोरम